
संयुक्त राष्ट्रे : मुख्यतः मजबूत ग्राहकोपयोगी वस्तूंची खरेदी आणि गुंतवणुकीमुळे भारताचा जीडीपी २०२५ मध्ये ६.६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. भारताच्या होणाऱ्या मजबूत कामगिरीमुळे चालू वर्षात दक्षिण आशियातील आर्थिक वाढ ही मजबूत राहण्याची अपेक्षा आहे, असेही त्यात नमूद केले आहे.
बुधवारी येथे प्रसिद्ध झालेल्या ‘यूएन वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स २०२५’मध्ये म्हटले आहे की, दक्षिण आशियासाठी नजीकच्या काळातील दृष्टिकोन मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. २०२५ मध्ये ५.७ टक्के आणि २०२६ मध्ये ६.० टक्के वाढीचा अंदाज आहे. भारतामध्ये तसेच भूतान, नेपाळ आणि श्रीलंका यासह इतर काही अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक सुधारणा होतील. २०२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ६.८ टक्क्यांनी वाढली आणि २०२५ मध्ये ६.६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. २०२६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ६.८ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
दक्षिण आशियाई प्रदेशातील सर्वात मोठी असलेली भारताची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये ६.६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज असून प्रामुख्याने मजबूत खासगी वापर आणि गुंतवणुकीचा आधार हा त्यास बळ देणारा ठरणार आहे. याशिवाय, पायाभूत सुविधांच्या विकासावरील भांडवली खर्चाचे मजबूत गुणाकार परिणाम येत्या वर्षांतील वाढीवर अपेक्षित आहेत, असे अहवालात म्हटले आहे. सेवा आणि काही वस्तूंच्या श्रेणींमध्ये, विशेषतः फार्मास्युटिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मजबूत निर्यात वाढ भारतासाठी आर्थिक विकासाला चालना देईल, असे त्यात नमूद केले आहे. पुरवठ्याच्या बाजूने, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील विस्तार अंदाज कालावधीत अर्थव्यवस्थेला चालना देत राहील.