
हारून शेख / लासलगाव
नाशिकसह महाराष्ट्रात द्राक्ष हंगामाला जोरदार सुरूवात झाली असून देशभरातील द्राक्ष खरेदीदार दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यातून युरोप आणि इतर देशामध्ये आता पर्यंत २८ हजार २९६ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. तर देशांतर्गत विविध राज्यात बाजार पेठा फुलू लागले आहेत. द्राक्ष हंगामासाठी सध्या पोषक वातावरण आहे द्राक्षाची गुणवत्ता चांगली असून देखील निर्यातक्षम द्राक्षाला कमी भाव मिळत असल्याने उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे.
यंदाच्या हंगामात राज्यातुन द्राक्ष निर्यातीसाठी ४२ हजार २२४ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा प्रतिकूल परिस्थितीतही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यातीची संधी आहे. बांगलादेशमध्ये नाशिक जिल्ह्याच्या द्राक्षांना प्रचंड मागणी आहे तेथे भावही आहे मात्र व्यापारीवर्गाकडून कुठले कारण नसताना द्राक्षांना कमी भाव दिला जात आहे. शेतकऱ्यांनी घाई गर्दी न करता कमी दरात द्राक्षची विक्री करू नये असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी केले आहे.
द्राक्ष निर्यात वाढीसाठी आंतरराष्ट्रीय नियम, वाहतूक अनुदान आदींसाठी सरकारच्या दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे. त्यामुळे देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाढ होईल आणि उत्पादक शेतकऱ्यांना मालाचे चांगले दर मिळतील. गेल्या दोन-तीन दिवसांत उन्हाचा कडाका वाढला असून द्राक्षाची गोडी वाढत आहे. त्यामुळे युरोपीय देशातील निर्यातीचा वेग वाढणार आहे. आखाती देशात डिसेंबर पासून निर्यात सुरू झालेली आहे.
चालू द्राक्ष हंगामाचा विचार करता एक ऑक्टोबर २०२४ ते ६ फेब्रुवारी २०२५पावेतो युरोपीय देशासाठी१२२७ कंटेनर द्वारे सुमारे १६२६०मे .टन द्राक्ष निर्यात करण्यात आली तर युरोपियन देशाव्यतिरिक्त इतरत्र देशात ८२६ कंटेनर मधून १२०८९मे. टन द्राक्ष निर्यात करण्यात आला असा एकूण २०४३ कंटेनर मधून २८ हजार२९६ मे. टन द्राक्ष निर्यात करण्यात आला आहे.
द्राक्ष शेतीला नेहमीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. मागील वर्षी इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा फटका द्राक्ष निर्यातीला बसला. युद्धाच्या पार्श्वभूमीवर लाल समुद्रात हुती बंडखोरांनी जहाजांवर हल्ले केले. त्यामुळे लाल समुद्रातून युरोप आणि अमेरिकेत होणारी द्राक्ष निर्यातीसाठी नवीन मार्गाने करावी लागली. परिणामी, वाहतूक खर्चात वाढ झाली. त्यात द्राक्ष निर्यातीला पोषक वातावरण असतांना ही व्यापारीवर्गाने द्राक्ष दर कमी केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठली घाई करते न करता आपला माल टप्याटप्याने विक्री करावा.
- कैलास भोसले, अध्यक्ष द्राक्ष बागायतदार संघ
पर्यावरणीय बदलामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस अवघड होत आहे. सिंचन सुविधा जरी असली तरी रोज बदलत असलेल्या हवामानाला समर्थपणे तोंड देऊ शकेल अशी कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही. यामुळे शेती करणे जिकिरीचे झाले आहे.
- वसंत ताकाटे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कारसूळ