अदानी पॉवरकडून विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडवर ताबा; ४ हजार कोटींचा व्यवहार, ६०० मेगावॉट क्षमता

विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडचा ६०० मेगावॉटचा प्रकल्प अदानी पॉवर लिमिटेडने खरेदी केल्याची घोषणा केली. ४ हजार कोटी रुपयांना हा प्रकल्प खरेदी केला.
अदानी पॉवरकडून विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडवर ताबा; ४ हजार कोटींचा व्यवहार, ६०० मेगावॉट क्षमता
Published on

नवी दिल्ली : विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडचा ६०० मेगावॉटचा प्रकल्प अदानी पॉवर लिमिटेडने खरेदी केल्याची घोषणा केली. ४ हजार कोटी रुपयांना हा प्रकल्प खरेदी केला.

१८ जून २०२५ रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या मुंबई खंडपीठाने विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेडच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

७ जुलै २०२५ रोजी या प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर अदानी पॉवर लिमिटेडची क्षमता आता १८१५० मेगावॉट झाली आहे. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे. या कंपनीचे नागपूर येथील बुटीबोरी येथील ३०० मेगावॉटचे दोन प्रकल्प आहेत. अदानी पॉवर लिमिटेडने ताबा व अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण केली. हा प्रकल्प ४ हजार कोटींचा आहे. अदानी पॉवर लिमिटेडने २०२९-३० पर्यंत ३०६७० मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता करण्याचे ठरवले आहे. अदानी पॉवर लिमिटेड सध्या सहा ब्राऊनफिल्ड अल्ट्रा सुपरक्रिटीकल पॉवर थर्मल प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. प्रत्येक प्रकल्पाची क्षमता १६०० मेगावॉट आहे. हे प्रकल्प सिंगरौली-महान (मध्य प्रदेश), रायपूर-रायगड आणि कोरबा (छत्तीसगड), कवाई (राजस्थान) उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे हे प्रकल्प उभारले जातील.

अदानी पॉवर लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील ऊर्जा निर्मिती कंपनी बनू शकेल. २०३० पर्यंत तिची क्षमता ३०६७० मेगावॉट असेल.

अदानी पॉवर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. ख्वालीया म्हणाले की, आम्ही सातत्याने आमच्या पोर्टफोलिओमध्ये वाढ करत आहोत. भारताच्या ‘प्रत्येकाला वीज’ या योजनेला पाठिंबा देत आहोत. अदानी पॉवर विश्वासार्ह, किफायतशील दरात वीजपुरवठा करण्यासाठी वचनबद्ध आहे.

अदानी पॉवर लिमिटेडने गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड व तमिळनाडूत १८१५० मेगावॉटचे प्रकल्प स्थापित केले. गुजरातमध्ये कंपनीने ४० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबवत आहे.

logo
marathi.freepressjournal.in