‘भारत प्रथम’ आणि ‘मेक इन इंडिया’चे कौतुक; ब्रिक्स गुंतवणूक व्यासपीठ महत्त्वाचे : पुतिन यांचे मत

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को येथे आयोजित १५ व्या व्हिटीबी रशिया कॉलिंग या गुंतवणूक मंचावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘भारत-प्रथम’ धोरणाची आणि मेक इन इंडिया’ उपक्रमाची प्रशंसा केली.
‘भारत प्रथम’ आणि  ‘मेक इन इंडिया’चे कौतुक; ब्रिक्स गुंतवणूक व्यासपीठ महत्त्वाचे : पुतिन यांचे मत
Published on

नवी दिल्ली : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को येथे आयोजित १५ व्या व्हिटीबी रशिया कॉलिंग या गुंतवणूक मंचावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘भारत-प्रथम’ धोरणाची आणि मेक इन इंडिया’ उपक्रमाची प्रशंसा केली. राष्ट्रपती पुतिन यांनी भारताच्या विकासात या धोरणांनी कसा हातभार लावला यावर भर देत, विकासासाठी स्थिर वातावरण निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांची पोचपावती दिली.

उत्पादकतेला चालना देण्यासाठी आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाने जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे त्यांनी नमूद केले. पुतिन यांच्या वक्तव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची आर्थिक प्रगती अधोरेखित झाली. त्यांनी भारत सरकारचे आणि लघु-मध्यम उद्योगांसाठी (एसएमई) ‘स्थिर परिस्थिती’ निर्माण करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले, विशेषत: ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राबवलेल्या आर्थिक उपक्रमांवर पुतीन यांनी भर दिला.

अध्यक्ष पुतिन यांनी भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात असलेली रशियाच्या आत्मनिर्भरता केंद्रित आयात धोरण कार्यक्रमाची साम्य स्थळे दाखवली आणि भारतात उत्पादन करण्याबाबत रशियाची तयारी दर्शवली. भारतातील गुंतवणूक फायदेशीर आहे, असेही ते म्हणाले. भारताच्या नेतृत्वाने आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देण्यावर भर दिला आहे, यावरही त्यांनी भर दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेक इन इंडिया नावाचा आमच्यासारखाच एक कार्यक्रम आहे. आम्ही आमचे उत्पादन भारतात देखील करण्यास तयार आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार, भारत प्रथम या धोरणाला अनुसरून उद्योगाबाबत स्थैर्य निर्माण करत आहे. आम्हाला विश्वास आहे की भारतातील गुंतवणूक फायदेशीर आहे, असे रशियाचे अध्यक्ष म्हणाले. रोजनेफ्ट या रशियन कंपनीने अलीकडेच भारतात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे, अशी माहितीही पुतीन यांनी दिली.

एसएमईच्या वाढीवर आणि ‘ब्रिक्स’ देशांमध्ये एसएमईसाठी सुरळीत व्यवसाय व्यवहार वातावरण करण्यासाठी जलद विवाद निराकरण यंत्रणेची आवश्यकता, यावर लक्ष केंद्रीत करत, अध्यक्ष पुतिन यांनी ‘ब्रिक्स’च्या उत्क्रांतीच्या संदर्भात रशियाच्या आत्मनिर्भरता केंद्रित आयात धोरण कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती-तंत्रज्ञान, उच्च-तंत्रज्ञान आणि कृषी यांसारख्या क्षेत्रातील स्थानिक रशियन उत्पादकांच्या यशाकडे लक्ष वेधून त्यांनी बाजारातून बाहेर पडणाऱ्या पाश्चात्य उत्पादन नाम चिन्हां(ब्रँड)च्या जागी होत असलेल्या नवीन रशियन ब्रँडच्या उदयाकडे लक्ष वेधले.

आमच्यासाठी, आमच्या आत्मनिर्भरता केंद्रित आयात धोरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे विशेष महत्त्वाचे आहे. नवीन रशियन ब्रँड्सच्या उदयामुळे, स्वेच्छेने आमची बाजारपेठ सोडलेल्या पाश्चात्य कंपन्यांची जागा घेण्यास मदत होत आहे. आमच्या स्थानिक उत्पादकांनी केवळ ग्राहकोपयोगी वस्तूंमध्येच नव्हे तर, माहिती-तंत्रज्ञान आणि उच्च-तंत्रज्ञान उद्योगांमध्येही लक्षणीय यश मिळवले आहे, असे ते म्हणाले.

पुतिन यांनी ‘ब्रिक्स’च्या वाढीस पाठबळ देण्यासाठी ‘ब्रिक्स’ राष्ट्रांनी आपापसात सहकार्य वाढवावे असे आवाहन केले आणि पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या आगामी शिखर परिषदेतील सहयोगासाठी प्रमुख क्षेत्रे निश्चित करण्याकरिता सदस्य देशांना प्रोत्साहित केले.

logo
marathi.freepressjournal.in