Bajaj CNG Bike : बजाज लवकरच देशातील पहिली सीएनजी बाईकनं लॉन्च करणार आहे. ही बाईक कोणत्या तारखेला लॉन्च केली जाणार, हेसुद्धा आता स्पष्ट झालं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार जगातील पहिली सीएनजी बाईक जवळपास तयार आहे. नवी CNG बाईक भारतीय बाजारपेठेत 5 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. तथापि, लॉन्चपूर्वी, बजाज सीएनजी बाईक पुन्हा एकदा चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे.
सीएनजी बाईक लॉन्च प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. CNG बाईकच्या डिझाइन, फीचर्स आणि मायलेजबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
डिझाईन:
नवीन स्पाय फोटोज पाहता, बजाज सीएनजी बाइकचे डिझाइन स्पोर्टी असणार आहे. त्यात नवीन अलॉय व्हील्स आणि स्पोर्ट सायलेन्सर दिसत आहे. नवीन बाईकमध्ये सीटखाली सीएनजी फ्यूल टँक असेल.
याशिवाय या बाईकमध्ये पेट्रोल टँकही दिला जाऊ शकतो. यापूर्वी बजाज सीएनजी मोटारसायकलचे दोन व्हेरियंट टेस्ट राइड्सदरम्यान समोर आले होते. रिपोर्टनुसार, या बाईक्स शहरी आणि ग्रामीण गरजांनुसार डिझाइन केल्या गेल्या आहेत.
फीचर्स:
या बाईकच्या रेग्युलर व्हेरियंटमध्ये डिजीटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, सिंगल-पीस सीट, हँड गार्ड, एलईडी हेडलाइट्स, बल्ब इंडिकेटर आणि इंजिन साइड लेग गार्ड यांसारखी फीचर्स देण्यात येणार आहेत.
याशिवाय एक रिफाइनड मॉडेल देखील स्पॉट केलं गेलं आहे. या मॉडेलमध्ये कॉम्पॅक्ट विंडस्क्रीनसह अपडेटेड मिरर आहे. या बाईकचे बहुतेक डिझाइन बजाज सिटी 125X मोटरसायकलसारखे आहे.
किती असेल किंमत? :
पेट्रोलवर चालणाऱ्या मोटारसायकलपेक्षा सीएनजी बाईक थोडी महाग असेल. नवीन बाईक जवळपास 80,000 रुपये (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध असेल असं सांगण्यात येत आहे.
मायलेजचा विचार करायचा झाल्यास, ही बाईक 1 किलो CNG मध्ये 100 ते 120 किमी अंतर कापू शकेल. तथापि, तिच्या इंधन परफॉर्मन्सबाबत डिटेल्स 5 जुलै रोजी उपलब्ध होईल.
बजाजच्या सीएनजी ऑटोला बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत सीएनजी बाईक्सही नवी क्रांती घडवून आणतील, अशी कंपनीला आशा आहे. अहवालानुसार, कंपनी दरवर्षी 1 ते 1.20 लाख CNG मोटारसायकलींचे उत्पादन करण्याचा प्लॅन करत आहे.
५ जुलै रोजी लाँच होणाऱ्या या CNG पॉवरवर चालणाऱ्या बाईककडून ग्राहकांना मोठ्या अपेक्षा आहेत. बजाजची नवीन बाईक बजेट आणि मध्यमवर्गीय लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बनवली गेली आहे.