आजकाल प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय करतील, याचा नेम नाही. आपले व्हिडिओ व्हायरल व्हावेत, यासाठी अनेकजण कोणतंही धाडस करत नाहीत आणि ते त्यांच्या अंगलट येतं. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिंद्रा थारच्या एसयूव्ही समुद्रात अडकलेल्या दिसत आहेत.
इंस्टाग्राम रिल बनवण्याच्या नाद तरुणांच्या अंगाशी आला. रिल बनवण्यासाठी त्यांनी आधी कार बीचवर नेल्या आणि नंतर त्या समुद्रात घातल्या. त्यानंतर जे काही घडलं, त्यानं तरूणांना चांगलीच अद्दल घडली. त्यांची इन्स्टाग्राम रिलचा व्हिडिओ व्हायरल झाला नाहीच, पण त्यांची जी अवस्था झाली,त्याचा व्हिडिओ मात्र तुफान व्हायरल झाला.
Torque Indiaने या घटनेचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर शेअर केला आहे. या 25 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही दोन थार एसयूव्ही पाण्यात बुडलेल्या पाहू शकता. हा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र नेमकं ठिकाण समजू शकलेले नाही.
व्हिडिओला "गुजरातमध्ये अडकलेल्या दोन व्हेल... एक पांढरी आणि दुसरी लाल" असे कॅप्शन दिलं आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाच्या दोन महिंद्रा थार एसयूव्ही समुद्रात अडकलेल्या दिसत आहे.
लाल रंगाच्या थार चालकानं आपली एसयूव्ही समुद्रात जास्त आत नेल्यामुळं थारचा पुढचा भाग पाण्यात बुडाला. त्यामुळं समुद्राच्या लाटांनी कारला सर्व बाजूंनी वेढलेलं दिसत आहे. पांढऱ्या रंगाची थार एसयूव्हीही तशाच पद्धतीनं अडकल्याचं दिसत आहे. परंतु ती लाल कारच्या तुलनेत थोडी बाहेरच्या बाजूला झुकल्याचं दिसत आहे. दरम्यान दोघंही वाहनचालक घाबरून बाहेर पडल्याचं दिसत आहे.
समुद्र किनाऱ्यावर थार वाहन चालवत असताना ही घटना घडल्याचे समजते. जिथे गाडीचे टायर समुद्रकिनारी वाळूत अडकले. वाहन वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करूनही जोराच्या लाटांचा तडाखा बसल्याने वाहन आणखी बुडाले.
स्थानिक लोकांच्या मदतीने दोन्ही वाहने अखेर किनाऱ्यावर काढण्यात आली. मात्र, स्थानिक लोकांच्या रोषाला घाबरून तरुणांनी वाहन सोडून तेथून पळ काढला. त्यानंतर मोटार वाहन विभागाने घटनास्थळी पोहोचून वाहन क्रमांक तपासला आणि मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन्ही महिंद्रा थारही जप्त करण्यात आल्या आहेत.