
मुंबई 19 जून : ब्रिजस्टोन इंडियाने सागेस्ट (सोसायटी फॉर एन्व्हायर्नमेंट अॅण्ड अॅग्रिकल्चरल सस्टेनेबिलिटी) या संस्थेच्या भागीदारीने मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील सुलवाड गावात 'ब्रिजस्टोन न्यूट्रिशनल फ्रूट ऑर्चर्ड प्रकल्प' सुरू केला आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणारा हा उपक्रम पर्यावरणीय शाश्वतता वाढवणे, पोषणमूल्य सुधारणे आणि ग्रामीण भागात उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, या उद्दिष्टांवर केंद्रित आहे.
सुमारे 4 एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या ऑर्चर्डमध्ये 15 पेक्षा जास्त प्रकारांची 1,300 हून अधिक फळझाडे शाश्वत पद्धतीने लावण्यात आली आहेत. या उपक्रमात ब्रिजस्टोनचे स्वयंसेवक आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. पहिल्याच वर्षात या प्रकल्पाने 96% झाडे टिकवून ठेवण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. महिलांनी 1,000 रोपांची नर्सरी यशस्वीरित्या सांभाळली असून, बागेतील जैविक कचऱ्यापासून कंपोस्ट आणि सेंद्रिय कीटकनाशक तयार करून सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे आणि उत्पन्नाच्या नव्या संधीही निर्माण केल्या आहेत. झाडे फळधारणेच्या अवस्थेत आल्यानंतर, त्यांच्या विक्रीमुळे महिलांसाठी वर्षभर उत्पन्नाचे स्थिर साधन उपलब्ध होणार आहे.
उपजीविकेच्या संधी बळकट करण्याबरोबरच या उपक्रमाच्या माध्यमातून सुलवाड गावात 251 घरगुती किचन गार्डन्सची उभारणी करून पोषण सुरक्षेत (प्रत्येक व्यक्तीला आवश्यक ते पौष्टिक अन्न वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे) देखील सुधारणा केली आहे. या बागांमुळे कुटुंबांना ताजी, घरात पिकवलेली भाजी मिळत असून त्यांचा आहार अधिक पौष्टिक झाला आहे. नियमित प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमांमुळे गावकऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव, सहभागाची भावना आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली आहे.
ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक हिरोशी योशिझाने म्हणाले, “खरी शाश्वतता केवळ व्यवसायापुरती मर्यादित नसते, तर ती समुदायांना सक्षम करण्याची आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याची प्रक्रिया असते. या प्रकल्पात केवळ झाडे लावलेली नाहीत, तर आशा, जिद्द आणि उज्वल भविष्यासाठी बीजे पेरण्यात आली आहेत. महिलांच्या नेतृत्वाखाली आणि समुदायाच्या सहभागातून पोषण, उपजीविका आणि पर्यावरण या तिन्ही क्षेत्रांवर एकाच वेळी दीर्घकालीन परिणाम घडवता येतो, हे या उपक्रमाने सिद्ध केले आहे.”
हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. यात अनेक भागधारकांचा सहभाग आहे. ब्रिजस्टोन आणि त्यांचे भागीदार सागेस्ट यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी केली असली तरी स्थानिक ग्रामपंचायतीने जमीन उपलब्ध करून दिली, स्थानिक महिलांना या प्रकल्पाची देखरेख व व्यवस्थापनाचे काम केले आणि या प्रकल्पाला लागून असलेल्या निवासी शाळेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. पर्यावरणाची शाश्वतता, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि महिलांचे सबलीकरण केंद्रस्थानी ठेवून ब्रिजस्टोन इंडियाने सुरू केलेला न्यूट्रिशनल फ्रूट ऑर्चर्ड प्रकल्प म्हणजे कॉर्पोरेट जबाबदारीतून उभा राहिलेला, समाजाच्या सहभागातून घडणाऱ्या परिवर्तनाचा एक आदर्श नमुना आहे.