हौसेला मोल नाही! बिझनेसमनने VIP नंबरसाठी मोजले तब्बल २५.५ लाख रुपये

एवढ्या पैशात तर स्कॉर्पिओ आली असती...VIP नंबरसाठी कारमालकानं खर्च केले लाखो रूपये
हौसेला मोल नाही! बिझनेसमनने VIP नंबरसाठी मोजले तब्बल २५.५ लाख रुपये

मुंबई: लग्जरी कार चालवणारे लोक अनेकदा आपल्या गाडीला VIP नंबर प्लेट लावतात. त्यांची कार इतरांपेक्षा हटके दिसावी म्हणून ते फॅन्सी नंबर घेतात. परंतु असे नंबर घेण्यासाठी बऱ्याचदा मोठी रक्कम खर्च करावी लागते. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीने आपल्या महागड्या कारला फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी तब्बल २५.५ लाख रुपये खर्च केले. एवढे पैसे खर्च केल्यानंतर त्याला हवा असलेला त्याचा आवडता '९९९९' हा नोंदणी क्रमांक त्याला मिळाला.

काय आहे हे संपूर्ण प्रकरणः

हैदराबादमधील सोनी ट्रान्सपोर्ट सोल्युशन्सच्या मालकाने आपल्या टोयोटा लँड क्रूझर कारच्या नंबरसाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च करून '९९९९' हा नोंदणी क्रमांक मिळवला आहे. त्याच्या २.१ कोटी रुपये किंमतीच्या टोयोटा लँड क्रूझर LX लक्झरी SUV कारचा क्रमांक आता TG-09 9999 आहे. ही फॅन्सी नंबर प्लेट खरेदी करून सोनी ट्रान्सपोर्ट सोल्युशन्सने तेलंगणामध्ये नवा विक्रम केला आहे.

इतक्या महागड्या नंबर प्लेट्सची यापूर्वी कधीही विक्री झाली नव्हती, याआधी ९९९९ हा नंबर सर्वाधिक किमतीत म्हणजेच २१.६ लाख रुपयांना विकला गेला होता. '९९९९' या खास फॅन्सी नंबरच्या लिलावासाठी ११ जणांनी बोली लावली होती, अखेर हा नंबर २५.५ लाख रुपयांना विकला गेला.

टोयोटा लँड क्रूझरची खासियत:

टोयोटा लँड क्रूझर ही अत्यंत दमदार, अत्याधुनिक फीचर्सने युक्त अशी आणि तितकीच महागडी एसयूव्ही आहे. या कारला 20 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कारमध्ये 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे, ज्यामध्ये ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कंपॅटिबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. टोयोटा लँड क्रूझर ही लोकप्रिय ऑफ-रोडर एसयूव्ही म्हणून ओळखली जाते.

ही कार प्रेशियस व्हाईट पर्ल, सुपर व्हाईट, डार्क रेड मीका मेटॅलिक, ॲटिट्यूड ब्लॅक आणि डार्क ब्लू मीका या पाच बाह्य रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. न्यू जनरेशन टोयोटा लँड क्रूझर 300 एसयूव्ही दोन इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

यात 3.5L V6 ट्विन-टर्बो पेट्रोल आणि 3.3L V6 ट्विन-टर्बो डिझेल इंजिनचा पर्याय आहे. तिचे 3.3 L V6 टर्बो-डिझेल इंजिन हे ट्विन-टर्बो डिझेल इंजिन आहे, जे 304 bhp पॉवर आणि 700 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 10-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

3.5-लिटर V6 ट्विन-टर्बो इंजिन 409 bhp पॉवर आणि 650 Nm टॉर्क निर्माण करते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, यात 10 एअरबॅग्ज, EBD, ABS, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, पार्किंग सपोर्ट ब्रेक आणि ADAS फीचर्स देण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in