
नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या कॅनरा बँकेने सोमवारी डिसेंबर २०२४ ला संपलेल्या तिमाहीत त्यांच्या स्वतंत्र निव्वळ नफ्यात १२.२५ टक्क्यांनी वाढ होऊन ४,१०४ कोटी रुपये झाल्याचे आभासी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मागील वर्षीच्या याच कालावधीत बँकेने ३,६५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता. चालू आर्थिक वर्षाच्या (आर्थिक वर्ष २५) ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न ११.७ टक्क्यांनी वाढून ३६,११४ कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षीच्या ३२,३३४ कोटी रुपये होते, असे शेअर बाजाराला बँकेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
बँकेचे ग्रॉस नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (GNPA) प्रमाण डिसेंबर २०२३ पर्यंत ४.३९ टक्क्यांवरून डिसेंबर २०२४ पर्यंत ३.३४ टक्क्यांपर्यंत सुधारले. शिवाय, निव्वळ नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (एनएनपीए) प्रमाण डिसेंबर २०२३ पर्यंत १.३२ टक्के होते, ते डिसेंबर २४ पर्यंत ०.८९ टक्क्यांपर्यंत सुधारले.
कोल इंडियाचा तिसऱ्या तिमाहीचा नफा १७ टक्के घसरला
सरकारी कंपनी कोल इंडिया लिमिटेडने सोमवारी ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात १७.४ टक्क्यांनी घसरण नोंदवून रु. ८,४९१.२२ कोटी इतका झाला. विक्रीत घसरण झाल्याने नफ्यात घट झाली. कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ने बीएसईला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, कंपनीने मागील वर्षीच्या कालावधीत १०,२९१.७१ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. ऑक्टोबर-डिसेंबर आर्थिक वर्ष २५ मधील विक्री ३२,३५८.९८ कोटी रुपये इतकी घसरली असून एका वर्षापूर्वी वरील तिमाहीत हा आकडा ३३,०११.११ कोटी रुपये होता, असे या माहितीमध्ये म्हटले आहे. तिसऱ्या तिमाहीत कोळसा कंपनीचा एकूण खर्च आधीच्या तिमाहीच्या रु. २५,१३२.८७ कोटींवरून वाढून रु.२६,२०१.५५ कोटी झाला आहे. देशांतर्गत कोळसा उत्पादनात कोल इंडिया लि.चा वाटा ८० टक्क्यांहून अधिक आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँकेचा तिमाही नफा ३३९ कोटी
आयडीएफसी फर्स्ट बँकेने आज ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांचे अलेखापरिक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील ७१६ कोटी रुपयांवरून निव्वळ नफा ५३ टक्के घसरुन आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ३३९ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीतील २०१ कोटी रुपयांवरून ६९ टक्क्यांनी नफा वाढला. आर्थिक वर्ष २०२५ च्या ९ महिन्यांसाठी, वार्षिक आधारावर निव्वळ नफा ४५.३ टक्के कमी झाला. सूक्ष्म-वित्त कर्जांचे वितरण मंदावल्याने उत्पन्नात घट, सूक्ष्म-वित्तावरील तरतुदींमध्ये वाढ आणि बिगर-सूक्ष्मवित्त व्यवसायाच्या क्रेडिट खर्चाचे सामान्यीकरण यामुळे नफ्यावर मोठा परिणाम झाला.नफा ३३९ कोटी झाला तर मुख्य ऑपरेटिंग नफा वार्षिक तुलनेत १५ टक्के वाढला, असे आयडीएफसी फर्स्ट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ व्ही. वैद्यनाथन म्हणाले.
अदानी विल्मरचा तिसऱ्या तिमाहीचा नफा दुपटीने वाढून ४११ कोटींवर
मजबूत खाद्यतेलाच्या विक्रीमुळे अदानी विल्मरच्या डिसेंबर २०२४ ला संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ होऊन ४१०.९३ कोटी रुपयांवर पोहोचला, असे कंपनीने सोमवारी जाहीर केले. मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीला २००.८९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. नियामकाला दिलेल्या माहितीनुसार, या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून रु. १६,९२६ कोटी झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत रु. १२,८८७.२१ कोटी होते. खाद्यतेल विभागातील महसूल वाढून १३,३८६.७१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत ९,७१०.८२ कोटी रुपये होता. अन्न आणि एफएमसीजी विभागातील महसूल रु. १,२७३ कोटींवरून रु. १,५५८ कोटींवर पोहोचला आहे, तर उद्योगांना आवश्यकता असलेल्या वस्तुंमधून मिळणारा महसूल रु. १,८४४.१२ कोटींवरून रु. १,९१४.५९ कोटींवर पोहोचला आहे. याआधीच्या तिमाहीतील १२,६०६.२६ कोटी रुपयांच्या तुलनेत खर्च डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत खर्च १६,३७९.७६ कोटी रुपयांवर अधिक झाला.