खेळणी उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; सोमवारी नवी दिल्लीतील बैठकीत सविस्तर चर्चा

खेळण्यांच्या क्षेत्रातील वाढत्या संधी, यासंदर्भातील नियामक घडामोडी, भारताला जागतिक खेळण्यांचे केंद्र बनवणे आणि जागतिक पुरवठा साखळीत भारतीय खेळणी उत्पादकांना एकत्रित करण्याचे मार्ग या मुख्य मुद्यांवर चर्चा
खेळणी उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; सोमवारी नवी दिल्लीतील बैठकीत सविस्तर चर्चा
Unsplash - Huy Hung Trinh

नवी दिल्ली : सरकारी अधिकारी आणि उद्योगक्षेत्र ८ जुलै रोजी देशांतर्गत उत्पादन आणि खेळण्यांच्या निर्यातीला चालना देण्याच्या मार्गांवर सविस्तर चर्चा करतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. टॉय असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने इन्व्हेस्ट इंडिया, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी) द्वारे ही बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीत खेळण्यांच्या क्षेत्रातील वाढत्या संधी, यासंदर्भातील नियामक घडामोडी, भारताला जागतिक खेळण्यांचे केंद्र बनवणे आणि जागतिक पुरवठा साखळीत भारतीय खेळणी उत्पादकांना एकत्रित करण्याचे मार्ग या मुख्य मुद्यांवर चर्चा होणार आहे.

टॉय असोसिएशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेश कुमार गौतम म्हणाले की, या क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी सरकारने आधीच अनेक पावले उचलली आहेत. देशांतर्गत उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी येथील प्रगती मैदानावर ६ ते ९ जुलै दरम्यान आंतरराष्ट्रीय मेळा आयोजित केला जात आहे, त्यात ३५ देशांतील १५० हून अधिक विदेशी खरेदीदार भेट देत आहेत. ४०० हून अधिक देशांतर्गत खेळणी उत्पादक कंपन्या त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन करतील. गौतम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एका ‘मन की बात’ कार्यक्रमात खेळणी उद्योगाचा उल्लेख केला आहे आणि त्यामुळे क्षेत्राच्या वाढीला अधिक जोर देण्यात येत आहे. सरकारने स्टॉलधारकांना आर्थिक सहाय्य वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, ८ जुलैच्या ‘टॉय इंडस्ट्री सीईओ मीट’मध्ये डीपीआयआयटी, इन्व्हेस्ट इंडिया आणि देशांतर्गत उद्योगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. २०१४ पासून खेळण्यांच्या निर्यातीत २४० टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि या कालावधीत आयात ५२ टक्क्यांनी घसरली आहे. महिलांसाठी मोठ्या संधी आहेत आणि अंदाजानुसार, सुमारे ७० टक्के कर्मचारी महिला आहेत. नोएडामध्ये एका मोठ्या ‘टॉय क्लस्टर’च्या विकासासाठी बांधकाम सुरू झाले आहे.

हा भारतातील सर्वात मोठा टॉय क्लस्टर असेल. सुमारे १५० लोकांना खेळण्यांचे युनिट्स उभारण्यासाठी जमीन मिळाली आहे. लवकरच अनेक कारखाने येऊन उत्पादन सुरू करतील, असे नोएडास्थित लिटल जिनियस टॉईज प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ असलेले गौतम म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in