नवी दिल्ली : चीन २०२३-२४ मध्ये ११८.४ अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापारासह भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे चीनने अमेरिकेला मागे टाकले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०२३-२४ मध्ये ११८.३ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होऊन अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
२०२१-२२ आणि २०२२-२३ दरम्यान वॉशिंग्टन हा नवी दिल्लीचा सर्वोच्च व्यापारी भागीदार होता. गेल्या आर्थिक वर्षात भारताची चीनला होणारी निर्यात ८.७ टक्क्यांनी वाढून १६.६७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्या देशाच्या निर्यातीत उत्तम वाढ नोंदवणाऱ्या मुख्य क्षेत्रांमध्ये लोहखनिज, सुती धागे/फॅब्रिक्स/मेडअप, हातमाग, मसाले, फळे आणि भाज्या, प्लास्टिक आणि लिनोलियम यांचा समावेश आहे. शेजारील देशातून आयात ३.२४ टक्क्यांनी वाढून १०१.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली आहे. दुसरीकडे, २०२२-२३ मध्ये ७८.५४ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये अमेरिकेला होणारी निर्यात १.३२ टक्क्यांनी घसरून ७७.५ अब्ज डॉलर्स झाली आहे, तर आयात सुमारे २० टक्क्यांनी घसरून ४०.८ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर झाली आहे, असे आकडेवारी सांगते.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) ने म्हटले की, आर्थिक वर्ष २०१९ ते आर्थिक वर्ष २४ पर्यंत भारताच्या व्यापारात आघाडीच्या १५ व्यापार भागीदारांसह महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. त्यामुळे निर्यात आणि आयात दोन्हीवर परिणाम झाला आणि विविध क्षेत्रांमधील व्यापार तूटवर परिणाम झाला. त्यात चीनच्या निर्यातीत ०.६ टक्क्यांनी किरकोळ घट होऊन १६.७५ अब्ज डॉलर्सवरून १६.६६ अब्ज डॉलर्सवर, तर चीनमधून आयात ४४.७ टक्क्यांनी वाढली असून ७०.३२ अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून १०१.७५ अब्ज डॉलर्स झाली.
जीटीआरआयचे संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले, आयातीतील या वाढीमुळे व्यापार तूट वाढली असून आर्थिक वर्ष २०१९ मधील ५३.५७ अब्ज डॉलर्सवरून आर्थिक वर्ष २४ मध्ये ८५.०९ अब्ज डॉलर्स झाली आहे.