
नवी दिल्ली : अन्नधान्याच्या, विशेषतः भाज्यांच्या किमती कमी झाल्याचा दिलासा गेल्या महिन्यात मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ५.४८ टक्क्यांवर कमी झाला आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर ६.२१ टक्के होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकानुसार, नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या महागाई दर ९.०४ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर १०.८७ टक्के तर नोव्हेंबर २०२३ मध्ये ८.७० टक्के होता.
कार्यालयाने स्पष्ट केले की, नोव्हेंबर २०२४ मध्ये भाजीपाला, डाळी व डाळीजन्य पदार्थ, साखर व मिठाई, फळे, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मसाले, वाहतूक व दळणवळण तसेच वैयक्तिक निगा वापर वस्तू आणि इतर वस्तूंमध्ये महागाईदरामध्ये लक्षणीय घट झाली आहे.
जुलै-ऑगस्ट महिन्यात सरासरी ३.६ टक्के असलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित प्रमुख महागाई दरामध्ये सप्टेंबरमध्ये ५.५ टक्के आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये ६.२ टक्के वाढ झाली. हा सप्टेंबर २०२३ नंतरच्या वर्षभरातील सर्वाधिक दर होता.
मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज ४.५ टक्क्यांवरून ४.८ टक्के केला. तसेच अन्नधान्याच्या किमतीवरील दबावामुळे डिसेंबर तिमाहीत महागाई दर अधिक राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते.
जुलै - ऑगस्टमध्ये ३.६ टक्के सरासरी असलेला ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर सप्टेंबरमध्ये ५.५ टक्के आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये ६.२ टक्क्यांवर गेला, असे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
खर्चवाढीच्या आघाडीवर सकारात्मक चिन्हे दिसत असून अन्न महागाई कमी होत आहे. अन्नधान्य महागाई पुढील दोन तिमाहीत सामान्य पातळीवर येईल, अशी अपेक्षा आहे. अधिक कृषी उत्पादन आणि सरकारकडून पायाभूत प्रकल्पांवर आणि ग्रामीण योजनांवर होणाऱ्या खर्चामुळे खर्च वाढीला चालना मिळेल. सरकारचा भांडवली खर्च वाढविणे आणि पायाभूत सुविधांवर भर देणे, महसुली खर्चावर लक्ष केंद्रित न करता, हा एक योग्य दृष्टिकोन आहे. यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला मदत होत आहे.
- हर्ष व्ही. अगरवाल, नवनियुक्त अध्यक्ष, फिक्की