आगामी अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्र्यांकडून सल्लामसलत बैठकींचा समारोप

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ साठी अर्थसंकल्प तयार करण्याचा भाग म्हणून अर्थसंकल्पपूर्व उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी सल्लामसलत बैठकी सुरू होत्या.
आगामी अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्र्यांकडून सल्लामसलत बैठकींचा समारोप

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ साठी अर्थसंकल्प तयार करण्याचा भाग म्हणून अर्थसंकल्पपूर्व उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी सल्लामसलत बैठकी सुरू होत्या. केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ च्या पार्श्वभूमीवर १९ जून २०२४ पासून केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ मंत्रालयात सुरू झालेल्या अर्थसंकल्पपूर्व विचारविमर्शांचा ५ जुलै २०२४ रोजी समारोप झाला. सीतारामन यांनी व्यापार आणि सेवांच्या प्रतिनिधींसोबत सातव्या अर्थसंकल्पपूर्व विचारविमर्श बैठकांचे अध्यक्षपद भूषवले.

सीतारामन २३ जुलै रोजी त्यांचा सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी 3.0 चा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल जो २०४७ पर्यंत विकसित भारतसाठी मार्ग निश्चित करणार आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना सांगितले की, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक ऐतिहासिक पावले आणि मोठे आर्थिक निर्णय घेतले जातील. १८ व्या लोकसभेत संसदेच्या संयुक्त बैठकीला आपल्या पहिल्या अभिभाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि भविष्यवादी दृष्टीचा एक प्रभावी दस्तऐवज असेल.

अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ साठी १९ जूनपासून सुरू झालेले अर्थसंकल्पपूर्व अधिवेशन ५ जुलै २०२४ रोजी संपले. वैयक्तिक सल्लामसलत करताना, १२० हून अधिक निमंत्रित, १० संघटनांचे प्रतिनिधी, निमंत्रित, तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ, कामगार संघटना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, रोजगार आणि कौशल्य, एमएसएमई, व्यापार आणि सेवा, उद्योग, अर्थतज्ज्ञ, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजार तसेच, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि शहरी क्षेत्रातील प्रतिनिधी अर्थमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकींमध्ये सहभागी झाले होते, असे त्यात म्हटले आहे.

अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकांना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांचा सहभाग होता. वित्त सचिव आणि सचिव खर्च, टी. व्ही. सोमनाथन; आर्थिक व्यवहार सचिव, अजय सेठ, डीआयपीएएम सचिव, तुहिन के. पांडे, वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी आणि महसूल सचिव, संजय मल्होत्रा ​​यांच्यासह इतर उपस्थित होते.

या चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी मूल्यवान सूचना केल्याबद्दल सहभागींचे आभार व्यक्त केले आणि तज्ज्ञ आणि प्रतिनिधींना आश्वासन दिले की, केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ तयार करताना त्यांच्या सूचनांचे काळजीपूर्वक परीक्षण केले जाईल आणि विचार केला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in