Damaged Note Exchange RBI Rule : अनेकदा जेव्हा तुम्ही एटीएममधून पैसे काढायला जाता आणि फाटलेल्या नोटा मिळतात तेव्हा तुम्हाला काळजी वाटू लागते. या नोटा आता कोण घेणार आणि त्यांचं काय करायचं? हे प्रश्न आपल्याला सतावू लागतात. परंतु काळजी करण्याची गरज नाही. कारण ATM मधून निघालेल्या फाटक्या नोटा तुम्ही सहजतेने बदलू शकता.
विशेष म्हणजे बँका तुम्हाला या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्यासाठी नियम निश्चित केले आहेत. त्यामुळे आता फाटलेल्या नोटा चिकटवून त्या गुप्तपणे फिरवण्याऐवजी तुम्ही त्या बदलून घेऊ शकता आणि आरबीआयच्या नियमांनुसार नवीन नोटा मिळवू शकता.
फाटलेल्या नोटा बदलणं खूपच सोपं:
आरबीआयचे नियम सांगतो की जर एटीएम कार्डमधून फाटलेल्या नोटा निघाल्या तर बँक त्या बदलण्यास नकार देऊ शकत नाही. बँकेत नोटा बदलण्यासाठीची प्रक्रिया जास्त वेळखाऊ नाही, काही मिनिटांत ती पूर्ण होते आणि ती खूपच सोपी आहे.
सर्वप्रथम तुम्हाला या फाटलेल्या नोटा ज्या बँकेच्या एटीएम मशीन बाहेर आल्या त्या बँकेत घेऊन जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक अर्ज लिहावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला पैसे काढण्याची तारीख, वेळ आणि तुम्ही ज्या एटीएममधून पैसे काढले आहेत त्याचे नाव नमूद करावे लागेल. यासोबतच एटीएमकडून जारी केलेल्या स्लिपची प्रतही जोडावी लागेल, जर स्लिप जारी केली नसेल तर तुम्ही मोबाइलवर मिळालेल्या ट्रान्झॅक्शन डिटेल्सची माहिती देऊ शकता.
कुठे आणि कोणत्या प्रकारच्या नोटा बदलल्या जातील?
आरबीआयच्या परिपत्रकानुसार, फाटलेल्या नोटा आरबीआय इश्यू ऑफिस, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका किंवा खाजगी क्षेत्रातील चेस्ट ब्रांचमध्ये बदलल्या जाऊ शकतात. जर तुमच्याकडे फाटलेल्या किंवा कुजलेल्या नोटा असतील आणि त्यांचा नंबर पॅनल ठीक असेल तर 10 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटा बदलून घेता येतील. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलू शकते, या नोटांचे एकूण कमाल मूल्य 5,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
तथापि, काही परिस्थितींमध्ये नोटा बदलल्या जाऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, नोटा वाईटरित्या जळालेल्या किंवा तुकड्यांमध्ये असल्यास त्या बदलल्या जाऊ शकत नाहीत. अशा नोटा फक्त आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये जमा केल्या जाऊ शकतात. नियमानुसार, कोणत्याही बँकेने तुमच्या फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास, तुम्ही थेट रिझर्व बँकेकडे तक्रार करू शकता.