नवी दिल्ली : निर्यातदारांना बँकांकडून होणाऱ्या पतपुरवठ्यात घसरण झाल्यामुळे या क्षेत्राला फटका बसेल आणि व्यापारी ११ सप्टेंबर रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या समस्येवर ठळकपणे भूमिका मांडतील, असे उद्योग अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
२०२१-२२ आणि २०२३-२४ दरम्यान रुपयात निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ झाली, तर मार्च २०२४ मधील पतपुरवठ्यातील थकबाकी २०२२ मधील त्याच महिन्याच्या तुलनेत ५ टक्क्यांनी घसरली, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
सर्वोच्च निर्यातदार संघटना फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (एफआयईओ) ने म्हटले आहे की, निर्यात पतवाढ देशाच्या वाढत्या निर्यातीशी जुळत नाही. वस्तुंच्या किमतीत झालेली वाढ, मालवाहतूक (समुद्री आणि हवाई दोन्ही) आणि लाल समुद्रातील संकट यामुळे दीर्घ कालावधीसाठी अधिक कर्जाची गरज असतानाही आम्ही मार्च २०२२ ते मार्च २०२४ दरम्यान निर्यात कर्जात घट झाली आहे, असे एफआयईओचे महासंचालक अजय सहाय यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.
एफआयईओच्या मते, मार्च २०२४ च्या तिमाहीत निर्यात कर्ज थकबाकीचे मूल्य २,१७,४०६ कोटी रुपयांवर आले आहे जे मागील वर्षी याच तिमाहीत २,२७,४५२ कोटी रुपये होते. आम्ही मंत्र्यांसोबत निर्यातदार समुदायाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करू, असे सहाय म्हणाले.