मुंबई: सोने, चांदी, हिरे तसेच दागिनेसारख्या मौल्यवान धातूंच्या किंमती दिवाळीत वाढूनही मागणीमुळे त्यांची विक्री यंदाच्या सणात ३० हजार कोटी रुपयांपुढे जाण्याबाबतचा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
सोमवारपासून दिवाळी सुरू झाली आहे. तर मंगळवारी धनत्रयोदशीला रात्रीपर्यंत मुंबईसारख्या सराफा दालनांमध्ये खरेदीसाठी गर्दी होती. सोने तसेच चांदीचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असूनही ग्राहकांकडून मागणी आहे.
ग्राहक सोन्याकडे विश्वासार्ह मालमत्ता म्हणून पाहत असून तुलनेने वाढत्या मागणीमुळे चांदीला अधिक लोकप्रियता मिळत आहे. यंदाच्या दिवाळीत देशभरात मौल्यवान धातूच्या किंमती चढ्या राहूनही त्याची खरेदी मात्र वाढू शकते, असे मानले जाते. चांदीने ४० टक्क्यांहून परतावा दिला आहे. तर सोन्याने २३ टक्क्यांसह शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकालाही याबाबत मागे टाकले आहे.
जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने याबाबत नमूद केले आहे की, जागतिक अनिश्चितता आणि भू-राजकीय स्थितीमुळे सोन्याचे दर वाढत आहेत. तर परवडणारा पर्याय म्हणून चांदीला मागणी आहे. हिऱ्यांच्या मागणीवर परिणाम झाल्यामुळे यावर्षी हिरेऐवजी सोने खरेदीचा कल गुंतवणूकदारांमध्ये दिसून येत असल्याचे निरिक्षणही नोंदविण्यात आले आहे.
अंकुरहाटी जेम्स अँड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक बेंगानी यांनी सांगितले की, मौल्यवान धातूबाबतची बाजारातील स्थिरता वाढवण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याच्या मागणीचा पाठपुरावा करण्याचे उद्योगाचे प्रयत्न सुरू आहेत. भू-राजकीय स्थिती ही सोन्याच्या आयातीवरील सध्याच्या १५ टक्क्यांवरून आयात शुल्क ९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठीची गरज अधोरेखित करते. यामुळे बाजारपेठेची भरभराट होणे अधिक सुलभ होईल, असेही ते म्हणाले.
सेन्को गोल्ड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुवांकर सेन यांनी सांगितले की, सोन्याच्या वाढत्या किमतीचा विक्रीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. यंदा १२ ते १५ टक्के घसरण होण्याची भीती आहे. तुलनेत कमी ९ कॅरेट शुद्धता असलेल्या दागिन्यांचा पर्याय वाढल्याने मागणीही वाढली आहे. अंजली ज्वेलर्सने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला असलेल्या मागणीमुळे यंदा मागणी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कंपनीच्या अन्नरघा उत्तिया चौधरी म्हणाले की, यंदाच्या धनत्रयोदशीला खरेदीदार हे त्यांच्या गरजेनुसार बनवलेले दागिन्यांना पसंती देत आहेत. तर लग्नासाठी म्हणून काही ग्राहक सुट्ट्या दागिन्यांची खरेदी करत आहेत. पुरुषांबाबत ब्रेसलेट, अंगठ्या यासारख्या वस्तूंचे आकर्षण वाढले आहे, असेही ते म्हणाले.
वर्षभरात सोने ८६ हजारांवर! चांदी सव्वा लाखांपर्यंत!!!
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडने, एमसीएक्सच्या व्यवहार मंचावर चांदीचा दर वर्ष-दिड वर्षात १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मौल्यवान धातूला असलेली औद्योगिक मागणी आणि सुरक्षितता यामुळे खरेदी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कंपनीने सोन्यासाठी तोळ्याकरिता ८१ हजार ते ८६ हजार रुपये असे मध्यम ते दीर्घकालीन उद्दिष्ट अंदाजित केले आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता, व्याजदराबाबतच्या अपेक्षा आणि डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया यामुळे सोने-चांदीला चालना मिळत असल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे.