अमेरिकेत TikTok (शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ॲप) चे भविष्य अनिश्चित आहे. टेस्लाचे CEO एलॉन मस्क TikTok खरेदी करण्याबाबतच्या अनेक चर्चा होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळत आहे. कारण एलॉन मस्क यांनी स्वतःच त्यांना TikTok खरेदी करण्यात अजिबात रूची नाही, असे स्षष्ट केले आहे.
वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ने दिलेल्या माहितीच्या आधारे 'मनी कंट्रोल'ने म्हटले आहे की, 'डाई वेल्ट - Di Welt' (जर्मन राष्ट्रीय दैनिक) ने जानेवारीच्या शेवटी आयोजित केलेल्या समिटमध्ये एलॉन मस्क हे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सहभागी झाले होते. 'डाई वेल्ट - Di Welt' यांनी शनिवारी ते ऑनलाइन प्रसारित केले.
या समिटमध्ये मस्क यांनी TikTok खरेदीबाबत स्पष्ट केले. ते म्हणाले, ''TikTok खरेदीबाबत मी अजितबात उत्सूक नाही. मी TikTok वापरत नाही तसेच TikTok चे स्वरुप मला माहित नाही. TikTok खरेदीची कोणतीही योजना नाही. TikTok साठी कोणतीही बोली लावलेली नाही. तसेच TikTok विकत घेऊन मी काय करणार?'',असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी एक गोष्ट विशेष करून नमूद केली की त्यांना कंपनी खरेदी करण्याऐवजी कंपनी सुरू करण्यावर त्यांचा भर असतो. ट्विटर खरेदी करणे हे अपवाद होते. ट्विटरचे आता एक्स नावाने पुन्हा ब्रँडिंग करण्यात आले आहे.
अमेरिकेत TikTok चे भविष्य अनिश्चित
TikTok अॅप हे चिनी कंपनी ByteDance (बाईट डान्स) च्या मालकीचे आहे. अमेरिकेत TikTok वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे. TikTok च्या माध्यमातून अमेरिकन्सचा मोठा डेटा संग्रहित केला जात असल्याचा ठपका त्याची मूळ कंपनी 'बाईटडांस'वर ठेवण्यात आला आहे. अमेरिकन संसदेने कायदा पारित करून TikTok अमेरिकेतील अधिकृत संस्थेला विक्री करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी तत्कालीन बायडन सरकारने 19 जानेवारीची मूदत दिली होती. अन्यथा ते बॅन करण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कारभार हाती घेतल्यानंतर TikTok ला 75 दिवसांची मूदतवाढ दिली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांची काय आहे भूमिका?
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प म्हणाले आहेत की ते TikTok च्या खरेदीबाबत अनेक लोकांशी चर्चा करत आहेत आणि या महिन्यात ॲपच्या भविष्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. अमेरिकेत TikTok चे सुमारे 17 कोटी वापरकर्ते आहेत.
अलिकडच्या अहवालानुसार, ट्रम्प यांनी उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्झ यांना TikTok च्या संभाव्य विक्रीवर देखरेख करण्याचे काम सोपवले आहे.
वॉशिंग्टन पोस्टच्या एका अहवालात म्हटले आहे की, बाइटडान्स चीन सरकारकडून मंजुरीची वाट पाहत असताना विक्रीसाठी वाटाघाटींना विलंब करत असल्याचे दिसून येत आहे, तसेच चीन कठोर भूमिका घेऊ शकतो, ज्यामुळे TikTok विक्रीला मंजुरी देण्याऐवजी TikTok चे अमेरिकेतील कामकाज बंद होऊ शकते.