
नवी दिल्ली : सोन्याच्या आयातीतील चुकीच्या आकडेवारीमुळे गेल्या महिन्यात झालेल्या धक्कादायक वाढीनंतर केलेल्या सुधारणांमुळे डिसेंबरमध्ये भारताची व्यापार तूट २१.९४ अब्ज इतकी कमी झाली आहे, असे सरकारी आकडेवारीने बुधवारी स्पष्ट केले.
जागतिक अनिश्चिततेमुळे निर्यात सलग दुसऱ्या महिन्यात वर्षभरात सुमारे एक टक्क्याने कमी होऊन ३८.०१ अब्ज अमेरिकन डॉलर झाली, तर आयात सुमारे ५ टक्क्यांनी वाढून ५९.९५ अब्ज डॉलर झाली.
पेट्रोलियम, रत्ने आणि दागिने आणि रसायनांसह प्रमुख निर्यात क्षेत्रांनी डिसेंबरमध्ये नकारात्मक वाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात २८.६२ टक्क्यांनी घसरून ४.९१ अब्ज डॉलर झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांतही ही निर्यात वार्षिक २०.८४ टक्क्यांनी घसरून ४९ अब्ज डॉलरवर आली आहे. तथापि, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, तांदूळ आणि सागरी उत्पादनांनी डिसेंबर २०२४ मध्ये चांगली वाढ झाली.
या आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबर दरम्यान एकत्रितपणे, निर्यातीत १.६ टक्क्यांनी वाढ होऊन ३२१.७१ अब्ज डॉलर आणि आयात ५.१५ टक्क्यांनी वाढून ५३२.४८ अब्ज झाली आहे. एप्रिल-डिसेंबर दरम्यान व्यापार तूट, मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत १८९.७४ अब्ज डॉलरवरून २१०.७७ अब्ज डॉलरपर्यंत वाढला आहे.
ताज्या आकडेवारीबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देताना वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल म्हणाले की, भारताची निर्यात वस्तू आणि सेवा या दोन्ही बाबतीत इतर देशांपेक्षा चांगली कामगिरी करत आहे.यावरून आमच्या निर्यातीची लवचिकता दिसून येते. या आर्थिक वर्षातील तीनही तिमाहीतही आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आम्ही नॉन-पेट्रोलियम निर्यातीत खूप चांगली कामगिरी करत आहोत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स निर्यात २४ महिन्यांच्या उच्चांकावर; डिसेंबर २०२४ मध्ये ३.५८ अब्ज डॉलर्सवर
भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात डिसेंबर २०२४ मध्ये ३५.११ टक्क्यांनी वाढून ३.५८ अब्ज डॉलरवर पोहोचली. त्यानुसार गेल्या २४ महिन्यांतील इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीची सर्वोच्च पातळी आहे, असे वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे. अनुकूल सरकारी धोरणे, वाढती जागतिक मागणी आणि देशांतर्गत उत्पादन क्षमतांचा विस्तार यामुळे देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील वाढती गती या मजबूत कामगिरीवरून दिसून येते.
वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल म्हणाले की, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत सातत्यपूर्ण वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारीपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत चांगली वाढ होऊन ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ही निर्यात अनुक्रमे ३.४३ अब्ज डॉलर आणि ३.४७ अब्ज डॉलर झाली होती. त्याचप्रमाणे, भारताच्या अभियांत्रिकी आणि औषध निर्यातीतही जानेवारीपासून सकारात्मक वाढ होऊन गेल्या महिन्यात ०.६३ टक्क्यांनी वाढून २.४९ अब्ज डॉलर झाली.
अभियांत्रिकी निर्यात एकूण निर्यातीच्या २५ टक्के असते, ती ८.३५ टक्क्यांनी वाढून ८४ अब्ज डॉलर झाली आहे.