नवी दिल्ली : विदेशी गुंतवणूकदारांनी या वर्षी जानेवारी-जून दरम्यान भारतीय रिअल इस्टेटमध्ये ३.१ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली. त्यांचा एकूण संस्थात्मक गुंतवणुकीच्या ६५ टक्के हिस्सा आहे, असे जेएलएल इंडियाने नमूद केले. रिअल इस्टेट सल्लागार जेएलएल इंडियाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी-जून २०२४ मध्ये रिअल इस्टेटमधील एकूण संस्थात्मक गुंतवणूक ६२ टक्क्यांनी वाढून ४,७६० दशलक्ष डॉलर झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ती २,९३९ दशलक्ष डॉलर होती.
याउलट, आणखी एक मालमत्ता सल्लागार कॉलियर्स इंडियाने या आठवड्याच्या सुरुवातीला, २०२४ च्या पहिल्या सहामाहीत ३,५२३.६ दशलक्ष डॉलरची रिअल इस्टेटमधील एकूण संस्थात्मक गुंतवणूक होऊन त्यात ६ टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. मागील वर्षीच्या कालावधीत ३,७६४.७ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक झाली होती, असे यासंदर्भातील अहवालात म्हटले होते.
जेएलएल इंडियाच्या मते, रिअल इस्टेटमधील संस्थात्मक गुंतवणूक या वर्षी जानेवारी-जूनमध्ये ४.८ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. ती आधीच्या २०२३ मधील एकूण गुंतवणुकीच्या ८१ टक्के असून त्याची रक्कम ५.८ अब्ज डॉलर होती. एकूण गुंतवणुकीपैकी वेअरहाऊसिंग क्षेत्राचा गुंतवणुकीतील हिस्सा ३४ टक्के होता, त्यानंतर निवासी क्षेत्राचा ३३ टक्के होता आणि कार्यालयाचा हिस्सा २७ टक्के होता. २०२४ च्या पहिल्या सहामाहीत ११३ दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या सरासरी ‘डील’ आकारासह, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास दुप्पट व्यवहार झाले. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारतीय गुंतवणुकीत सर्वाधिक वाटा उचला आहे. जानेवारी-जून २०२४ मधील एकूण गुंतवणुकीतील त्यांचा हिस्सा ६५ टक्के आहे, असे जेएलएलने सांगितले. २०२३ मध्ये, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ३७ टक्के गुंतवणूक केली होती.