जीडीपी ६.३ टक्के राहणार; चालू आर्थिक वर्षासाठी SBI रिसर्चचा अंदाज; तिसऱ्या तिमाहीत ६.२ ते ६.३ टक्के

चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) वाढीचा दर ६.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया रिसर्चने (एसबीआय) दिली आहे.
जीडीपी ६.३ टक्के राहणार; चालू आर्थिक वर्षासाठी SBI रिसर्चचा अंदाज; तिसऱ्या तिमाहीत ६.२ ते ६.३ टक्के
Published on

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) वाढीचा दर ६.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया रिसर्चने (एसबीआय) दिली आहे. अहवालानुसार, ३६ उच्च वारंवारता निर्देशकांच्या लाभामुळे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत अंदाजे जीडीपी वाढ ६.२ टक्के ते ६.३ टक्के राहील, असेही त्यात नमूद केले आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) नुसार, २०२४-२५ साठी ‘वास्तविक’ आणि ‘नाममात्र’ जीडीपी वाढीचा दर अनुक्रमे ६.४ टक्के आणि ९.७ टक्के असा राहण्याचा अंदाज आहे. अहवालानुसार, निरोगी ग्रामीण अर्थव्यवस्था स्थिरता आणि इतर क्षेत्रांमध्ये गती कायम ठेवत आहे. देशांतर्गत चलनवाढीच्या सध्याच्या मंदीमुळे उच्च ग्राहकोपयोगी खर्चाला प्रोत्साहन मिळावे आणि मागणी वाढीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

एसबीआय रिसर्चच्या दाव्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भांडवली खर्चात सुधारणा झाली आहे. भू-राजकीय घडामोडी आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे, कॅलेंडर वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील मंदीचा परिणाम केवळ भारतावरच नाही तर इतर देशांवरही झाला आहे. एसबीआयच्या अहवालानुसार, भारत अजूनही सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या ताज्या जागतिक वाढीचा अंदाजानुसार चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि आगामी आर्थिक वर्ष २०२५-२६ या दोन्हीमध्ये भारताचा विकास दर ६.५ टक्के असेल. मजबूत देशांतर्गत मागणी आणि सरकारच्या धोरणात्मक हस्तक्षेपामुळे विकास दर वाढेल, असेही एसबीआयने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in