
नवी दिल्ली : वाढत्या व्यापार तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती ४,५०० अमेरिकन डॉलर प्रति औंसपर्यंत वाढू शकतात. सध्याच्या ३,२४७ अमेरिकन डॉलर प्रति औंसच्या पातळीपासून वरील दर पाहता किमती जवळपास ३८ टक्क्यांनी वाढू शकतात, असे गोल्डमन सॅक्सच्या अहवालात म्हटले आहे.
यूएस-चीन व्यापार युद्धाची तीव्रता आणि जागतिक मंदीच्या वाढत्या भीतीचा हवाला देत, गोल्डमन सॅक्सने एका नोटमध्ये म्हटले आहे की, उच्च जोखमीच्या परिस्थितीत २०२५ च्या अखेरीस सोन्याच्या किमती ४,५०० प्रति औंसपर्यंत वाढू शकतात. सामान्य परिस्थितीत, २०२५ च्या अखेरीस सोने प्रति औंस ३,७०० अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल, अशी वित्तीय फर्मची अपेक्षा आहे.
गोल्डमन सॅक्सने वर्षअखेरीस २०२५ चे सोन्याचे लक्ष्य वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी, त्याने प्रति औंस ३,३०० अमेरिकन डॉलरवरचे लक्ष्य सुधारित केले होते.
विदेशी गुंतवणूक बँकेने म्हटले आहे की, चीनसोबतच्या वाढत्या व्यापारयुद्धामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर वाढलेल्या चिंतेमुळे सोन्याची सुरक्षित मालमत्ता म्हणून मागणी वाढली आहे.
सोन्याच्या किमती गेल्या आठवड्यात ६.५ टक्क्यांनी वाढल्या - कोविड-१९ साथीच्या आजारानंतरची त्यांची सर्वोत्तम साप्ताहिक कामगिरी ठरली.