नवी दिल्ली : डेबिट, क्रेडिट कार्डने २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर सध्या जीएसटी लागत नाही. पण, लवकरच या कार्डांवर २ हजारपर्यंतच्या व्यवहारांना १८ टक्के जीएसटी लागू होण्याची दाट शक्यता आहे.
जीएसटी कौन्सिलच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत अनेक निर्णय होणार आहेत. यात ‘बिलडेस्क’ आणि ‘सीसीएव्हेन्यू’ या पेमेंट एग्रिगेटर कंपन्यांवर १८ टक्के जीएसटी लावण्याच्या प्रस्तावावर सरकार चर्चा करू शकते. हा निर्णय झाल्यास २ हजार रुपयांपेक्षा कमी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पेमेंटवरही तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
बिलडेस्क आणि सीसीएवेन्यूसारख्या मोठ्या पेमेंट एग्रिगेटर्सना जीएसटी अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवल्या आहेत. २ हजार रुपयांपेक्षा कमी डिजिटल व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर जीएसटीची मागणी केली जाते. भारतातील एकूण डिजिटल पेमेंटपैकी ८० टक्क्यांहून अधिक रक्कम २ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात, एका सरकारी अधिसूचनेद्वारे, पेमेंट एग्रिगेटर्सना छोट्या व्यवहारांवर व्यापाऱ्यांना प्रदान केलेल्या सेवांवर कर लावण्यास बंदी घातली होती.
पेमेंट एग्रिगेटर व्यापाऱ्यांकडून प्रत्येक व्यवहारावर ०.५ टक्के ते २ टक्के शुल्क आकारतात. जर आता जीएसटी लागू झाल्यावर, तो भार ते ग्राहकांच्या माथी मारू शकतात.