नवी दिल्ली : जीएसटी सुधारणांच्या फायद्याचा लाभग्राहकांना कमी किमतींच्या स्वरूपात मिळत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले. 'जीएसटी बचत उत्सव' या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, '२२ सप्टेंबरपासून कमी जीएसटी दर लागू झाल्यापासून देशभरातील ५४ वस्तूंच्या किमतींत झालेल्या घसरणीवर सरकार लक्ष ठेवून आहे. जीएसटी दरकपातीमुळे खरेदीत वाढ झाली आहे.
खर्च वाढविण्याचा हा उपक्रम पुढेही सुरू राहील,' असे त्या म्हणाल्या. आम्हाला खात्री आहे की, प्रत्येक वस्तूवर कंपन्यांकडून ग्राहकांना जीएसटी कपातीचा फायदा दिला जात आहे. काही वस्तूंच्या बाबतीत तर व्यवसायांनी ग्राहकांना जीएसटी दरकपातीपेक्षा अधिक लाभ दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सीतारामन यांनी सांगितले की, ग्राहक व्यवहार विभागाला जीएसटी दरकपातीनुसार किमती कमी न झाल्याबाबत एकूण ३१६९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३०७५ तक्रारी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या नोडल अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्या आहेत. विभागाने आतापर्यंत ९४ तक्रारींचे निराकरण केले आहे.
त्या म्हणाल्या की, तक्रारी ज्या क्षेत्रातून प्राप्त झाल्या आहेत, त्या संबंधित विभागीय मुख्य आयुक्तांकडे थेट पाठवता येण्यासाठी ग्राहक तक्रार नोंदविण्याच्या पोर्टलवर एक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
जीएसटी दरात २२ सप्टेंबरपासून कपात लागू झाली. त्यामुळे टूथपेस्ट, शॅम्पू, गाड्या आणि टीव्ही सेट्ससह ३७५ वस्तूंच्या किमतींमध्ये घट झाली आहे.
५, १२, १८ आणि २८ टक्के या चार करदरांच्या ऐवजी आता फक्त दोन दर ५ टक्के आणि १८ टक्के लागू करण्यात आले. त्यामुळे दैनंदिन वापराच्या ९९ टक्के वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत.
सरकारने गेल्या महिन्यात अंमलात आणलेल्या जीएसटी सुधारणांमुळे यंदा २० लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खपाची अपेक्षा असल्याचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा खप अतिरिक्त २० लाख कोटी वाढणार
सर्व किरकोळ साखळ्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या नवरात्रीत विक्रीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ८५ इंची टीव्हीचा संपूर्ण स्टॉक विकला गेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या मागणीत झालेली वाढ ही थेट इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर परिणाम करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आता दुहेरी अंकातील वार्षिक वृद्धीदराने वाढत आहे. यावर्षी खप १० टक्क्यांहून अधिक वाढण्याची शक्यता आहे, म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त खपाची दाट शक्यता आहे, असे वैष्णव म्हणाले. ते अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.