नवी दिल्ली : रुग्णालयातून रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला आरोग्य विम्याचा क्लेम सेटलमेंट मिळण्यासाठी थांबावे लागते. कारण हा क्लेम सेटलमेंट करायला अनेक तास किंवा दिवस लागतात. आता हा विलंब चालणार नाही. विमा क्षेत्राची नियामक संस्था भारतीय विमान नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इर्डा) विमा धारकांच्या सोयीसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. यात विमाधारकांना कॅशलेस क्लेम तीन तासात देण्याचे आदेश लागू आहे.
‘इर्डा’ने आरोग्य विम्याशी संबंधित ५५ परिपत्रके रद्द केली असून एकच मास्टर परिपत्रक जारी केले. आता या परिपत्रकानुसार, आरोग्य विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३ तासात क्लेम मिळणार आहे. कोणत्याही पॉलिसीधारकाला रुग्णालयातून सोडेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. क्लेम सेटल होण्यास तीन तासांपेक्षा अधिक विलंब लागल्यास रुग्णालयाकडून आकारली जाणारी अतिरिक्त रक्कम विमा कंपनी भागधारकाच्या निधीतून उचलेल. तसेच उपचाराच्यावेळी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास तात्काळ क्लेम सेटलमेंट करण्याची कार्यवाही करावी. तसेच रुग्णाचा मृतदेह तात्काळ रुग्णालयातून सोडवावा, असे या आदेशात म्हटले आहे.
१०० टक्के कॅशलेस क्लेमवर लक्ष्य
‘इर्डा’ने सांगितले की, विमा कंपन्यांनी १०० टक्के कॅशलेस क्लेम सेटलमेंट होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपात्कालिन परिस्थितीत विमाधारकाची विनंती आल्यानंतर एका तासात कंपनीने त्यावर कार्यवाही केली पाहिजे. कॅशलेस क्लेमसाठी ‘इर्डा’ने ३१ जुलै २०२४ पर्यंत विमा कंपन्यांना मुदत दिली आहे. विमा कंपन्यांनी कॅशलेस क्लेम तडजोड करण्यासाठी रुग्णालयात डेस्क स्थापन करावेत, असे म्हटले आहे.
असे आहेत महत्त्वाचे निर्णय
-विमाधारकांना पॉलिसी कागदपत्रांबरोबरच ग्राहक सूचना पत्र द्यावे.
-पॉलिसी कालावधीत दावा न आल्यास पॉलिसीधारकांची विम्याची रक्कम वाढवावी किंवा प्रीमीयममध्ये सूट द्यावी.
-पॉलिसीधारकाने पॉलिसी रद्द करण्याचा पर्याय निवडल्यास उर्वरित कालावधीची रक्कम परत करावी