
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अखत्यारितील मुंबई शहरात डिसेंबर २०२४ मध्ये १२,५१८ मालमत्ता नोंदणी विक्री आणि नोंदणी झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत ११५४ कोटी महसूल जमा होईल.
गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत, मालमत्तेच्या नोंदणीत २ टक्के इतकी माफक वाढ झाली, तर मुद्रांक शुल्क संकलन वार्षिक आधारावर २४ टक्क्यांनी वाढले, तर उच्च-मूल्य व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे वर्ष २०२४ साठी मालमत्ता विक्री नोंदणीची एकूण संख्या १४१,३०२ पर्यंत पोहोचेल तर वर्षासाठी मालमत्ता नोंदणीतून उत्पन्न १२,१६१ कोटी राहण्याचा अंदाज आहे. हे दोन्हीही १३ वर्षांचा उच्चांक आहे. मासिक आधारावर डिसेंबर २०२४ मध्ये मालमत्तेच्या नोंदणीत २३ टक्के वार्षिक वाढ झाली, तर याच कालावधीत मालमत्ता नोंदणींमधून मुद्रांक शुल्क संकलन २५ टक्के वाढले. डिसेंबरमधील एकूण नोंदणीपैकी ८० टक्के निवासी मालमत्ता आहेत.
पश्चिम उपनगरे आणि मध्य उपनगरांचे वर्चस्व कायम राहिले असून एकूण बाजारपेठेतील हिस्सा तब्बल ८६ टक्के आहे. तथापि, मध्य उपनगरांचा हिस्सा २९ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढला, तर पश्चिम उपनगरांमध्ये ५७ टक्क्यांवरून ५३ टक्क्यांपर्यंत थोडीशी घट झाली.
१ हजार चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना मोठी मागणी
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, “मुंबईचे प्रॉपर्टी मार्केट आपली लवचिकता आणि अनुकूलता दाखवत आहे. १०००-२००० चौरस फूट आकाराच्या सदनिकांची लोकप्रियता वाढली असून त्यांचा वाटा ८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढला, तर २ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त असलेला सदनिकांचा हिस्सा २ टक्क्यांवर स्थिर राहिला. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या लहान युनिट्सच्या नोंदणीमध्ये तीव्र घट झाली असून ती ५१ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत घसरली. त्यामुळे प्रशस्त घरांसाठी वाढत्या पसंतीचे संकेत मिळतात.