घरांची विक्री ७ टक्क्यांनी वाढून १२ वर्षांच्या उच्चांकावर; २०२४ मध्ये आघाडीच्या ८ शहरांमध्ये ३.५ लाख युनिट्सवर विक्री : नाइट फ्रँक अहवाल

देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये २०२४ मध्ये घरांची विक्री वार्षिक ७ टक्क्यांनी वाढून १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली.
घरांची विक्री ७ टक्क्यांनी वाढून १२ वर्षांच्या उच्चांकावर; २०२४ मध्ये आघाडीच्या ८ शहरांमध्ये ३.५ लाख युनिट्सवर विक्री : नाइट फ्रँक अहवाल
Published on

नवी दिल्ली : देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये २०२४ मध्ये घरांची विक्री वार्षिक ७ टक्क्यांनी वाढून १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली. २०२४ मध्ये घरांच्या विक्रीचा आकडा ३,५०,६१३ युनिट्स झाला आहे. स्थिर तारण दर आणि मजबूत आर्थिक वाढ दरम्यान प्रीमियम घरांसाठी चांगली मागणी आहे, असे नाइट फ्रँकच्या अहवालात म्हटले आहे.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकने म्हटले होते की, २०२४ मध्ये घरांची विक्री चार टक्क्यांनी घसरून सात प्रमुख शहरांमध्ये जवळपास ४.६ लाख युनिट्सवर आली आहे. मात्र, हा दावा नाइट फ्रँकने हा दावा खोडून काढल्याचे दिसते.

मंगळवारी झालेल्या आभाासी पत्रकार परिषदेत मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी नमूद केले की, भारतीय गृहनिर्माण बाजारात प्रत्येकी २ ते ५ कोटी रुपयांच्या दरम्यानच्या घरांना जोरदार मागणी आहे. हैदराबाद आणि पुण्याने सार्वकालिक उच्चांक गाठला आणि मुंबईने १३ वर्षांचा उच्चांक नोंदवला.

मोठ्या आकाराच्या घरांच्या विभागात चिंता असूनही चांगली विक्री झाली. २-५ कोटींच्या श्रेणीमध्ये वार्षिक ८५ टक्के वाढ झाली आहे, जरी ५० लाख आणि रु. ५० लाख-१ कोटी विभागांमध्ये विक्री कमी झाली आहे, असे ते म्हणाले.

बैजल म्हणाले की, निवासी बाजारपेठेत २०२० पासून प्रचंड तेजी आली आहे. २०२४ मधील घरांच्या विक्रीचे प्रमाण १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. मागणी करणाऱ्या ग्राहकांच्या वाढत्या जीवनशैलीच्या गरजांना अधिक अनुकूल असलेल्या उत्पादनांसह बाजार मोठ्या आकाराच्या घरांच्या निर्मितीकडे वळत असल्याने प्रीमियमचा घरांचा कल अधिक वाढला आहे, असे ते पुढे म्हणाले.

बैजल म्हणाले की, बाजारपेठेतील घरांच्या विक्रीत वाढ ही स्थिर आर्थिक आणि व्याजदर परिस्थिती आणि अजूनही मजबूत गतीने नवीन वर्षात पाऊल टाकताना बाजारासाठी पुरेसा टेलविंड आहे. सल्लागार संस्था मुंबई, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर), बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, पुणे, अहमदाबाद आणि कोलकाता बाजारपेठेचा मागोवा घेते.

logo
marathi.freepressjournal.in