
नवी दिल्ली : या वर्षी आघाडीच्या सात प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री ४ टक्क्यांनी घसरून ४.६ लाख युनिट्सवर येण्याचा अंदाज आहे, तर मूल्याच्या बाबतीत विक्री १६ टक्क्यांनी वाढून ५.६८ लाख कोटी रु. झाली आहे, असे ॲनारॉकच्या अहवालात म्हटले आहे.
जमीन, मजूर आणि बांधकामाच्या काही कच्च्या मालाच्या वाढत्या दरांमुळे सात प्रमुख शहरांमध्ये या वर्षी घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर गृहनिर्माण ब्रोकरेज ॲनारॉकने म्हटले की, २०२४ मध्ये विक्रीत घट होण्याचे कारण म्हणजे सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान नियामक मंजुरींना विलंब होणे आहे. परिणामी गृहनिर्माण प्रकल्पांच्या नवीन लॉन्चमध्ये घट झाली आहे. असे असले तरी, घरांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे या वर्षात मूल्याच्या दृष्टीने विक्री वाढण्यास मदत झाली. रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकने गुरुवारी आपला गृहनिर्माण बाजार डेटा जारी केला. त्यात सात प्रमुख शहरांमधील २०२३ मध्ये विक्री झालेल्या ४,७६,५३० युनिट्सच्या तुलनेत २०२४ मध्ये किरकोळ चार टक्क्यांनी घट होऊन ४,५९,६५० युनिट्स विक्री झाली. तथापि, गृहनिर्माण युनिट्सच्या एकूण विक्री मूल्यात मागील वर्षीच्या ४.८८ लाख कोटींवरून २०२४ मध्ये १६ टक्के वार्षिक वाढ होऊन ५.६८ लाख कोटी रुपये झाले.
घरांच्या मालमत्तेच्या ताज्या पुरवठ्यावर भाष्य करताना ॲनारॉकचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले, २०२३ मधील ४,४५,७७० युनिट्सच्या तुलनेत २०२४ मध्ये पुरवठा ७ टक्क्यांनी घसरून ४,१२,५२० युनिट्स दाखवले. तर शहरांमध्ये दिल्ली-एनसीआरमधील घरांची विक्री २०२३ मधील ६५,६२५ युनिट्सवरून यावर्षी ६ टक्क्यांनी घसरून ६१,९०० युनिट्सवर येईल.
मुंबई एमएमआरमध्ये विक्री १ टक्के वाढली
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) मध्ये १,५३,८७० युनिट्सवरून किरकोळ १ टक्क्यांनी वाढून १,५५,३३५ युनिट्सची विक्री झाली. बंगळुरूमध्ये निवासी मालमत्तांची विक्री ६३,९८० युनिट्सवरून २ टक्क्यांनी वाढून ६५,२३० युनिट्सवर पोहोचली. तसेच पुण्यातील घरांची विक्री ८६,६८० युनिटवरून ६ टक्क्यांनी घसरून ८१,०९० युनिटवर आली. हैदराबादमध्ये ६१,७१५ युनिट्सवरून ५ टक्के घसरून ५८,५४० युनिट्स झाली, तर चेन्नईमध्ये २१,६३० युनिट्सवरून ११ टक्क्यांनी घसरून १९,२२० युनिट्सची विक्री झाली. कोलकात्यातील घरांची विक्री २०२४ मध्ये २० टक्क्यांनी घसरून १८,३३५ युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षी २३,०३० युनिट्स झाली होती.