गौतम अदानी पुन्हा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; मुंबई बनली आशियातील ‘अब्जाधीशांची राजधानी’!

हिंडेनबर्गच्या आरोपांनंतरही गौतम अदानी आणि कुटुंबाची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ९५ टक्क्यांनी वाढली आणि अदानी कुटुंबाने अव्वल ठरले आहे.
गौतम अदानी पुन्हा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; मुंबई बनली आशियातील ‘अब्जाधीशांची राजधानी’!
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : हिंडेनबर्ग संकटातही अदानींची एकूण संपत्ती १०,२१,६०० कोटी रुपयांनी वधारली आहे. त्यामुळे अब्जाधीश गौतम अदानी यांनी ११.६ लाख कोटींच्या संपत्तीसह मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. त्यांनी 'हुरुन इंडिया रिच लिस्ट'मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील आघाडीच्या १० श्रीमंत लोकांमध्ये अदानींच्या संपत्तीत सर्वाधिक भर पडली. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अंबानी यांची एकूण संपत्ती २०२४ च्या हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार २५ टक्क्यांनी वाढून १०.१४ लाख कोटी रुपये झाली आहे.

हुरुनच्या अहवालानुसार हिंडेनबर्गच्या आरोपांनंतरही गौतम अदानी आणि कुटुंबाची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ९५ टक्क्यांनी वाढली आणि अदानी कुटुंबाने अव्वल ठरले आहे. अदानी कुटुंबाची एकूण संपत्ती ११,६१,८०० कोटींवर पोहोचली असून गेल्या वर्षभरात समूहाच्या शेअर्समधील तेजीमुळे अदानींच्या संपत्तीत वाढ झाली.

शिव नाडर आणि एचसीएलचे कुटुंब ३.१४ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत, तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पूनावाला २०२४ मध्ये २.८९ लाख कोटी रुपयांच्या नेटवर्थसह चौथ्या स्थानावरून एक स्थानाने घसरले.

सन फार्मास्युटिकल्सचे दिलीप सांघवी गेल्या वर्षी सहाव्या क्रमांकाच्या तुलनेत २.५० लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर गेले आहेत.

झोहोच्या राधा वेम्बू या महिलांमध्ये ४७,५०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत होत्या, तर २० वर्षांच्या आसपास वय असलेले झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा अनुक्रमे ३,६०० कोटी, ४,३००कोटींच्या संपत्तीसह यादीतील सर्वात तरुण आहेत.

शाहरुख खानने ७,३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत पदार्पण केले, जे ४,६०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह व्यावसायिक भागीदार जुही चावलापेक्षा पुढे आहे.

एक हजार कोटींची संपत्ती असलेले १,५३९ व्यक्ती

हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये प्रथमच एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण संपत्ती असलेल्या १,५३९ व्यक्तींचा समावेश झाला आहे. अशाप्रकारे, सात वर्षांपूर्वीच्या तुलनेत १५० टक्क्यांची लक्षणीय वाढ दिसून आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत २२० श्रीमंतांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी भारतात दर पाच दिवसांनी एक नवीन अब्जाधीश उदयास आल्याचे अहवालात म्हटले आहे.

आशियातील २५ टक्के अब्जाधीशांची घरे मुंबईत

भारताची आर्थिक राजधानी मुंबई आशियातील ‘अब्जाधीशांची राजधानी’ बनली आहे. मुंबईत चीनची राजधानी बीजिंगपेक्षा अधिक अब्जाधीश आहेत. आशियातील २५ टक्के अब्जाधीशांची घरे मुंबईत असल्याचे सांगण्यात आले आहे. या अर्थाने मुंबई शहर संपूर्ण आशियातील ‘अब्जाधीशांची राजधानी’ बनले आहे. त्यामुळे मुंबईने चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकले आहे. एवढेच नाही तर हुरुन इंडिया रिच लिस्टर्ससाठीही मुंबई हे आवडते शहर आहे. यादीत या शहरानंतर नवी दिल्ली आणि हैदराबादचा क्रमांक लागतो.

या वर्षीच्या अब्जाधीशांच्या यादीत वाढ होऊन मुंबईतील अब्जाधीशांची संख्या ५८ झाली आहे. त्यापाठोपाठ नवी दिल्लीत १८ नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. या यादीनुसार अब्जाधीशांच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. या यादीनुसार, वरील कालावधीत भारतामध्ये २९ टक्के अधिक अब्जाधीशांची वाढ झाली तर चीनमधील अब्जाधीशांच्या संख्येत २५ टक्क्यांनी घट झाली. चीनमध्ये अब्जाधीशांच्या संख्येत २५ टक्के घट झाली आहे, तर भारतात त्यांची संख्या २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासह अब्जाधीशांची संख्या विक्रमी ३३४ वर पोहोचली आहे.

logo
marathi.freepressjournal.in