

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने एक ऑगस्टपासून बँकेत बचत खाते उघडणाऱ्या खातेदारांसाठी किमान शिल्लक रक्कम पाच पट वाढवून ती ५० हजार रुपये केली आहे. हा नियम १ ऑगस्ट २०२५ नंतर उघडणाऱ्या खात्यांसाठी असेल.
बँक ग्राहकांसाठी ३१ जुलैपर्यंत खात्यातील किमान रक्कम १० हजार रुपये होती. नवीन नियमानुसार, अर्ध नागरी भागात किमान शिल्लक २५ हजार, तर ग्रामीण भागात १० हजार रुपये शिल्लक खातेदारांना ठेवावी लागेल. जमा रकमेवर वार्षिक २.५ टक्के व्याज मिळेल. खातेधारक किमान शिल्लक रक्कम ठेवू न शकल्यास कमीत कमी रकमेच्या ६ टक्के किंवा ५०० रुपये दंड म्हणून भरावा लागेल. जुन्या खातेधारकांना १० हजार रुपये शिल्लक ठेवावी लागेल. सार्वजनिक बँकांनी आपले दंड माफ केले किंवा त्याचे सुसूत्रीकरण केले असतानाच खासगी बँकांनी किमान शुल्क रकमेत वाढ केली.
आरबीआयच्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याने आयसीआयसीआय बँकेला ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. बँकेने काही तारण कर्जासाठी स्वतंत्र मूल्यांकनकाराकडून संपत्तीचे मूल्यांकन केले नाही. तसेच काही नियमांचे उल्लंघन बँकेने केले.
या ग्राहकांना मिळणार विशेष सवलत
ज्या ग्राहकांच्या बँक खात्यात मर्यादेपेक्षा अधिक रक्कम असेल. त्यांना खास सुविधा मिळतील. यात मोफत एनईएफटी, महिन्यातून तीन वेळा मोफत व्यवहार आदी सुविधा मिळतील. त्यानंतर प्रत्येक रोख व्यवहारावर १५० रुपये शुल्क लागेल. या शुल्कावर जीएसटीही द्यावा लागेल.
यांना मिळणार सवलत
वेतन खाते, पंतप्रधान जनधन खाते व किमान बचत बँक खाते धारकांना या नियमातून सूट मिळणार.