
लासलगाव/ वार्ताहर
मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतातून ५ लाख ३७ हजार मेट्रिक टन प्रक्रिया केलेला भाजीपाला देशातील निर्यातीपैकी सर्वाधिक प्रमाणात यूएसए, फिलिपाइन्स, यूके, थायलंड आणि युनायटेड अरब देशात निर्यात झाला असून देशाला तब्बल साडेसहा हजार कोटी रुपयांचे विदेशी चलन मिळाल्याचे ‘एपिडा’च्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.
भाजीपाल्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन त्यांची निर्यात वाढवून परकीय चलन मिळविण्यास वाव आहे. त्यामुळे शेतमाल प्रक्रिया उद्योगांना चालना व रोजगारनिर्मिती होऊ शकेल. भाज्या पचनास सोप्या आणि हलक्या असल्याने रोजच्या आहारात त्यांना खूप महत्त्व आहे. विविध आजार बरे करण्यास व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात भाज्यांचा वापर आहे. या कारणाने परदेशात प्रक्रिया केलेली भाजीपाल्याला मागणी वाढल्याचे एपिडाच्या आकडेवारीवरून दिसत आहे.
आर्थिक वर्ष २०२२ -२३ मध्ये भारतातून ४ लाख १० हजार मेट्रिक टन प्रक्रिया केलेला भाजीपाला निर्यात करून देशाला ४ हजार ९०० कोटींचे परकीय चलन मिळाले होते तर २३- २४ मध्ये यात ३० टक्क्यांहून अधिकची वाढ होत देशाला साडेसहा हजार कोटींचे विदेशी चलन मिळाले आहे.
प्रक्रिया केलेल्या भाजीपाल्यामध्ये कांदे, काकडी, मशरूम, ट्रफल्स, हिरवी मिरची, वाळलेल्या ट्रफल्स, निर्जलित शतावरी, निर्जलित लसूण पावडर, लसूण फ्लेक्स सुकवलेले बटाटे, हरभरे, हरभरा डाळ, कांदा काकडी, शतावरी, सेलरी, भोपळी मिरची, गोड कॉर्न यांसारख्या प्रक्रिया केलेल्या भाज्यांचा समावेश आहे.
लागवड आणि प्रक्रिया क्षेत्र
कच्च्या भाज्या सामान्यत: शेतात पिकवल्या जातात आणि प्रामुख्याने महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशातील डोंगराळ प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, या राज्यांमध्ये पिकतात. पंजाब, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि ओदिशा.
भारतातील तथ्ये आणि आकडेवारी
प्रक्रिया केलेल्या भाजीपाल्यांचा जगाला निर्यात करणारा प्रमुख देश म्हणून भारत ओळखला जातो. सन २०२३-२४ मध्ये देशाने ५ लाख ३७ हजार मेट्रिक टन प्रक्रिया केलेला भाजीपाला निर्यात करून साडेसहा हजार कोटींचे परकीय चलन मिळाले आहे.
प्रक्रियायुक्त भाजीपाला निर्यातीस मोठा वाव
भारतातून भाजीपाल्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात निर्यात होतात गेल्या वर्षी साधारण साडेसहा हजार कोटींचा व्यवसाय या माध्यमातून झाला ही देशासाठी आनंदाची बाब आहे. मानवी शरीरासाठी असणाऱ्या अन्नद्रव्यांच्या गरजेसाठी भाजीपाल्याचे सेवन करणे खूप आवश्यक झाले आहे. त्यामुळे विविध प्रक्रियांना वाव आहे. आपल्या देशातून विविध पालेभाज्यांच्या सुक्या पावडरी, याशिवाय ज्यूस, केचप, प्युरी यासारख्या पदार्थांना बाहेरच्या देशात मोठी मागणी आहे हे सर्व करत असताना शेतकऱ्यांनी विषमुक्त अर्थात रेसिड्यू फ्री भाज्यांचे उत्पादन घेणे खूप आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये जागतिक स्तरावर याबाबत निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे आपल्या देशातील उत्पादनांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून विषमुक्त भाजीपाला पिकवूनच त्याची प्रक्रिया करून निर्यात करण्याकडे शेतकऱ्यांचा शासनाचा आणि कृषी विभागाचा कल असला पाहिजे. प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात करण्यासाठी सोलर एनर्जी सिस्टीम वापरण्याची गरज आहे. आपल्या देशातील भाजीपाला उत्पादकांना वर्षभर मिळणारे दर हे कमी-अधिक असतात यात बाजारभाव पडण्याचा कालावधी हा जास्त असल्याने भाजीपाला उत्पादक फारसे अर्थार्जन करू शकत नाही हे वास्तव आहे यासाठीच प्रक्रिया होणे गरजेचे आहे. शासनस्तरावर निर्यातीची प्रक्रिया सुलभ करून शेतकऱ्यांना अधिकाधिक सवलती देणे आवश्यक आहे. आपल्या देशातील भाजीपाला पिकांची नासाडी बघता त्या तुलनेने प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रमाण आजही कमी आहे हे मात्र लक्षात घेतले पाहिजे येत्या काळात नासाडी कमी करून प्रक्रियेकडे वळण्याची गरज आहे.
- सचिन आत्माराम होळकर, कृषीतज्ज्ञ