
मुंबई : २०२५ च्या दुसऱ्या सहामाहीत भारतातील सणासुदीच्या हंगामात २.१६ लाखांहून अधिक हंगामी नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ‘गिग’ आणि तात्पुरत्या रोजगारांमध्ये वार्षिक आधारावर १५-२० टक्के वाढ होईल, असे बुधवारी एका अहवालात म्हटले आहे.
रिटेल, ई-कॉमर्स, बीएफएसआय, लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि एफएमसीजी यासारख्या क्षेत्रांमध्ये सणासुदीच्या काळात भरतीत वाढ होत आहे, असे वर्कफोर्स सोल्यूशन्स फर्म अॅडेको इंडियाने अहवालात म्हटले आहे.
आगामी रक्षाबंधन, दसरा, दिवाळी सणांमुळे हंगामी विक्री आणि लग्नाच्या हंगामासारख्या अपेक्षेने नोकरभरतीला वेग आला आहे. सणांच्या कालावधीतील वाढती मागणी पाहता त्याची तयारी सुनिश्चित करण्यासाठी अनेक कंपन्या भरती सुरु करत आहेत. या वर्षीच्या भरती वाढीचे कारण ग्राहकांच्या भावनांमध्ये सुधारणा, ग्रामीण मागणी वाढवणारा अनुकूल पाऊस, निवडणुकीनंतरचा आर्थिक आशावाद आणि आक्रमक हंगामी जाहिराती आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
हंगामी नोकऱ्यांमध्ये भरती करण्यावरील हा अहवाल अॅडेको इंडियाच्या क्लायंट बेस, विविध प्लॅटफॉर्मवरील उघडणाऱ्या पदांच्या आकडेवारी आणि उद्योग अहवालांवर आधारित आहे, असे अॅडेको इंडियाचे संचालक आणि जनरल स्टाफिंगचे प्रमुख दीपेश गुप्ता म्हणाले.