भारताची अमेरिकेला होणारी स्मार्टफोन निर्यात घसरतेय...GTRI चा दावा

भारताची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिकेला होणारी स्मार्टफोन निर्यात मे महिन्यातील २.२९ अब्ज डॉलर्सवरून ऑगस्ट महिन्यात ५८ टक्क्यांनी घसरून ९६४.८ दशलक्ष डॉलर्सवर आली आहे, असे थिंक टँक ‘जीटीआरआय’ने सोमवारी सांगितले.
भारताची अमेरिकेला होणारी स्मार्टफोन निर्यात घसरतेय...GTRI चा दावा
Published on

नवी दिल्ली : भारताची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिकेला होणारी स्मार्टफोन निर्यात मे महिन्यातील २.२९ अब्ज डॉलर्सवरून ऑगस्ट महिन्यात ५८ टक्क्यांनी घसरून ९६४.८ दशलक्ष डॉलर्सवर आली आहे, असे थिंक टँक ‘जीटीआरआय’ने सोमवारी सांगितले.

स्मार्टफोनवर कोणतेही आयात शुल्क नसताना स्मार्टफोनच्या निर्यातीत घसरण होणे ही घटना चिंताजनक आणि समजण्याच्या पलीकडील आहे. या घसरणीची खरी कारणे शोधण्यासाठी तातडीने चौकशीची आवश्यकता आहे, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) ने म्हटले आहे.

भारताची अमेरिकेला होणारी सर्वात मोठी निर्यात असलेली स्मार्टफोन निर्यात मे २०२५ मध्ये २.२९ अब्ज डॉलर्सवरून ऑगस्टमध्ये ५८ टक्क्यांनी घसरून ९६४.८ दशलक्ष डॉलर्सवर आली आहे. तसेच ही घसरण दरमहा स्थिर राहिली आहे. जूनमध्ये स्मोर्टफोनची निर्यात २ अब्ज डॉलर्स आणि जुलैमध्ये १.५२ अब्ज डॉलर्स होती.

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, अमेरिका १०.६ अब्ज डॉलर्सच्या आयातीसह भारताचा अव्वल स्मार्टफोन बाजार राहिला (भारताच्या जागतिक निर्यातीपैकी ४४ टक्के म्हणजे २४.१ अब्ज डॉलर्स), त्यानंतर युरोपियन युनियन ७.१ अब्ज डॉलर्स (२९.५ टक्के) आयात करत आहे.

ऑगस्टमधील भारताच्या निर्यातीपैकी २८.५ टक्के वाटा असलेल्या टॅरिफ-फ्री उत्पादनांमध्ये ४१.९ टक्क्यांची सर्वात मोठी घट झाली आहे, जी मेमधील ३.३७ अब्ज डॉलर्सवरून ऑगस्टमध्ये १.९६ अब्ज डॉलर्सवर आली आहे, असेही त्यात म्हटले आहे.

औषध निर्यातीत घट

औषध ​​उद्योगातही घट झाली आहे. औषधांची निर्यात १३.३ टक्क्यांनी घसरली आहे, मेमधील ७४५ दशलक्ष डॉलर्सवरून ऑगस्टमध्ये ६४६.६ दशलक्ष डॉलर्सवर आली आहे.

वस्त्रोद्योग, कपडे निर्यातीला फटका

वस्त्रोद्योग, कपडे आणि ‘मेड-अप’ अमेरिकेला होणारी निर्यात ९.३ टक्क्यांनी घसरून मे २०२५ मध्ये ९४३.७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून ऑगस्ट २०२५ मध्ये ८५५.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर आली आहे, असे त्यात म्हटले आहे.

दागिन्यांची निर्यात ९.१ टक्क्यांनी घसरली

ऑगस्टमध्ये दागिन्यांची निर्यात ९.१ टक्क्यांनी घसरून २२८.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर आली, असे त्यात म्हटले आहे. हिऱ्यांनी जडलेले सोन्याचे दागिने आणि कापलेले आणि पॉलिश केलेले हिरे यांनीही नकारात्मक वाढ नोंदवली आहे.

सीफूड निर्यातीत ४३.८ टक्के घसरण सीफूड निर्यात ४३.८ टक्क्यांनी घसरून मे महिन्यात २८९.७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून ऑगस्टमध्ये १६२.७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर आली आहे.

अमेरिकेला होणारी निर्यात आणखी घसरणार

जीटीआरआयचे संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले की, अमेरिकेत उच्च टॅरिफचा सामना करणाऱ्या भारतीय वस्तूंच्या निर्यातीतही घट होत आहे. ऑगस्टच्या आकडेवारीवरून केवळ उच्च दरांचा परिणाम अंशतः दिसून येतो. भारताने ६ ऑगस्टपर्यंत १० टक्के, २७ ऑगस्टपर्यंत २५ टक्के आणि २८ ऑगस्टनंतर ५० टक्के कर भरला. सप्टेंबर हा पहिला पूर्ण महिना असेल त्यात कापड, रत्ने आणि दागिने, कोळंबी, रसायने आणि सौर पॅनेलमधील घसरण आणखी वाढू शकते, असे श्रीवास्तव म्हणाले.

निर्यातीत सलग तिसऱ्या महिन्यात घसरण

अमेरिकेला भारताची निर्यात सलग तिसऱ्या महिन्यात घसरली आहे. वाढीव दरांचा हा अंदाजे परिणाम आहे. स्मार्टफोन आणि औषधांसारख्या शुल्कमुक्त निर्यातीत अनपेक्षित घसरण ही अधिक चिंताजनक आहे, ज्यामुळे भारताच्या प्रमुख पीएलआय यशोगाथेला धक्का बसण्याची भीती आहे. धोरणकर्ते आणि उद्योगांनी तातडीने कारणे तपासली पाहिजेत आणि ही घसरण आणखी वाढण्यापूर्वी कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in