भारत मोबाईल सायबर हल्ल्यांच्या अव्वल स्थानी; धक्कादायक अहवालात अमेरिका आणि कॅनडाला मागे टाकले

भारत आता मोबाईल सायबर (मालवेअर) हल्ल्यांच्या बाबतीत जागतिक स्तरावर अव्वल स्थानी पोहोचला आहे. यापूर्वीच्या तिसऱ्या क्रमांकावरून भारताने अमेरिका आणि कॅनडाला मागे टाकल्याचे एका धक्कादायक अहवालात म्हटले आहे.
भारत मोबाईल सायबर हल्ल्यांच्या अव्वल स्थानी; धक्कादायक अहवालात अमेरिका आणि कॅनडाला मागे टाकले
PM
Published on

नवी दिल्ली : भारत आता मोबाईल सायबर (मालवेअर) हल्ल्यांच्या बाबतीत जागतिक स्तरावर अव्वल स्थानी पोहोचला आहे. यापूर्वीच्या तिसऱ्या क्रमांकावरून भारताने अमेरिका आणि कॅनडाला मागे टाकल्याचे एका धक्कादायक अहवालात म्हटले आहे.

जून २०२३ ते मे २०२४ दरम्यान २० अब्जांहून अधिक धोका संबंधित मोबाईल व्यवहार आणि सायबर हल्ल्यांचा अभ्यास ‘Zscaler ThreatLabz 2024 मोबाइल, IoT आणि OT धोका’ अहवालात करण्यात आला आहे.

भारत आता मोबाईल सायबर (मालवेअर) हल्ल्यांसाठी जगातील प्रमुख लक्ष्य बनले आहे, ज्यामध्ये २८ टक्के हल्ले भारतावर झाले आहेत. त्यामुळे भारताने अमेरिका (२७.३ टक्के) आणि कॅनडा (१५.९ टक्के) यांना मागे टाकले आहे. मागील वर्षीच्या तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेपावल्याने भारतीय कंपन्यांनी सायबर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सुमारे निम्मे मोबाईल हल्ले ‘ट्रोजन’ प्रकारातील (जे वापरकर्त्यांना हानीकारक सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी फसवतात) असतात. त्यामुळे आर्थिक क्षेत्र विशेषतः असुरक्षित आहे. अहवालानुसार, बँकिंग सायबर हल्ल्यांमध्ये २९ टक्के वाढ झाली आहे, तर मोबाईल स्पायवेअर हल्ल्यांमध्ये १११ टक्क्यांची वाढ झाली आहे.

अनेक आर्थिक फायद्यासाठी प्रेरित मालवेअर हल्ले मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन (एमएफए) चकविण्यास सक्षम असतात आणि फिशिंग तंत्रांचा वापर करतात, जसे की बनावट लॉगइन पेजेस, सोशल मीडिया साइट्स आणि क्रिप्टो वॉलेट्स, असे अहवालात म्हटले आहे.

भारतीय कंपन्यांनी मजबूत ‘झिरो-ट्रस्ट’ सुरक्षा तयार करणे गरजेचे

पारंपरिक प्रणाली आणि असुरक्षित IoT/OT (इंटरनेट ऑफ थिंग्स/ऑपरेशनल टेक्नॉलॉजी) वातावरण सायबर गुन्हेगारांसाठी प्रमुख लक्ष्य बनत आहेत. या प्रणाली सुरक्षित करण्यासाठी भारतीय कंपन्यांनी मजबूत ‘झिरो-ट्रस्ट’ सुरक्षा फ्रेमवर्क स्वीकारणे गरजेचे आहे. हे केवळ महत्त्वाच्या प्रणालींना संरक्षण देणार नाही तर व्यवसायाची सलगता देखील सुनिश्चित करेल, असे Zscaler चे भारतातील CISO सुवब्रत सिन्हा यांनी सांगितले.

अहवालात गुगल प्ले स्टोअरवर २०० हून अधिक मालवेअर ॲप्लिकेशन्स आढळल्याचे आणि IoT मालवेअर व्यवहारांमध्ये वार्षिक आधारावर ४५ टक्के वाढ झाल्याचेही नमूद केले आहे, जे आजच्या सायबर धमक्यांच्या व्यापक स्वरूपाकडे निर्देश करते. सकारात्मक बाब म्हणजे, मालवेअर मूळ बिंदू म्हणून भारताने आपले स्थान सुधारले आहे.

logo
marathi.freepressjournal.in