

नवी दिल्ली : रशियाच्या दोन प्रमुख तेल उत्पादकांवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांनंतर भारतीय तेल कंपन्या आता मध्यपूर्व, लॅटिन अमेरिका आणि अमेरिका येथून कच्चे तेल खरेदी वाढवण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
२२ ऑक्टोबर रोजी अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल उत्पादक कंपन्या रोसनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर निर्बंध लादले. अमेरिकन कंपन्या व व्यक्तींना त्यांच्याशी व्यवहार करण्यास बंदी घातली असून, इतर देशांतील कंपन्यांनाही अशा व्यवहारांबद्दल कारवाईचा धोका आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानुसार, या कंपन्यांशी संबंधित सर्व विद्यमान व्यवहार २१ नोव्हेंबरपर्यंत बंद करावे लागतील.
सध्या रशिया भारताला दररोज सुमारे १.७ दशलक्ष पिंप कच्चे तेल पुरवतो, जे भारताच्या एकूण आयातीच्या जवळपास एकतृतीयांश आहे. त्यातील सुमारे १.२ दशलक्ष पिंप तेल थेट रोसनेफ्ट आणि लुकोइलकडून येते. यातील बहुतांश प्रमाणात तेल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि नायरा एनर्जी या खासगी कंपन्या खरेदी करतात, तर थोडे प्रमाण सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या घेतात.
केप्लरचे प्रमुख संशोधन विश्लेषक सुमित रितोलिया यांनी सांगितले की, रशियन तेलाचा प्रवाह २१ नोव्हेंबरपर्यंत १.६ ते १.८ दशलक्ष पिंप दरम्यान राहील, मात्र त्यानंतर ‘रोसनेफ्ट’ आणि ‘लुकोइल’कडून थेट खरेदी घटेल, कारण भारतीय कंपन्या निर्बंधांपासून बचाव करू इच्छितात.
रिलायन्सचा रोसनेफ्टसोबत २५ वर्षांचा करार आहे. ती पहिली कंपनी असेल जी थेट खरेदी थांबवू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, नायरा एनर्जी, जी सध्या पूर्णपणे रशियन तेलावर अवलंबून आहे, तिच्याकडे पर्याय फारच कमी आहेत. मध्यस्थ कंपन्यांमार्फत रशियन तेल खरेदी करतील, पण अधिक दक्षतेने, असे रितोलिया म्हणाले.