

नवी दिल्ली : भारतातून होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीवरील वॉशिंग्टनचे ५० टक्के शुल्क कमी करण्यासाठी भारत सरकार अमेरिकेबरोबर करार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. तथापि, हा करार कधी होईल यासाठी ते कोणतीही निश्चित कालमर्यादा देऊ शकत नाहीत, असे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले. भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करत आहेत, ज्यामध्ये विशेषतः परस्पर शुल्काच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी एक कराराचा समावेश आहे, असे अग्रवाल म्हणाले.
अमेरिकेने ऑगस्टमध्ये भारतातून होणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर ५० टक्के शुल्क लादले होते, ज्यात रशियाकडून कच्च्या तेलाच्या सततच्या खरेदीबद्दल नवी दिल्लीवर २५ टक्के दंडात्मक शुल्काचा समावेश होता. ५० टक्के शुल्कापासून आपल्या मोठ्या निर्यातीचे संरक्षण करण्यासाठी भारत या व्यापार करारासाठी प्रयत्न करत आहे, तथापि, गेल्या नऊ महिन्यांत भारत-अमेरिका व्यापार चर्चेचा मार्ग लक्षणीयरीत्या चढ-उताराचा राहिला आहे.
कृषी क्षेत्रातील मतभेदांमुळे ऑगस्टमध्ये चर्चा थांबली होती. सप्टेंबरमध्ये वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या, त्यानंतर दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी भेटीगाठी घेतल्या. तथापि, वाणिज्य मंत्रालयाने वारंवार यावर जोर दिला की, अमेरिकेच्या उपव्यापार प्रतिनिधींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या ताज्या भेटीसह यापैकी कोणतीही चर्चा औपचारिक वाटाघाटीची फेरी नव्हती.
अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत नोव्हेंबरमध्ये १.३ अब्ज डॉलरची वाढ
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत १.३ अब्ज डॉलरची वाढ झाली. - भारताची नोव्हेंबरमधील अमेरिकेला निर्यात ६.९८ अब्ज डॉलर, ऑक्टोबरमध्ये ६.३१ अब्ज डॉलर होती. तर मागील वर्षी याच काळात ५.७० अब्ज डॉलर होती.
भारताची एप्रिल-नोव्हेंबरमधील अमेरिकेतून आयात ३५.४० अब्ज डॉलर, मागील वर्षी याच काळात ३१.१९ अब्ज डॉलर होती
भारताची एप्रिल-नोव्हेंबरमधील अमेरिकेला निर्यात ५९.०४ अब्ज डॉलर, मागील वर्षी याच काळात ५३.०१ अब्ज डॉलर होती