...तरच रशियन तेल खरेदी कमी करू : भारताची अमेरिकेला अट

रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्याने भारतावर अमेरिकेने २५ टक्के अतिरिक्त शुल्क लावले आहे. रशियाकडून तेल खरेदी कमी करायची असल्यास आम्हाला इराण, व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीची परवानगी द्यावी, अशी अट भारताने अमेरिकेसमोर ठेवल्याचे कळते.
...तरच रशियन तेल खरेदी कमी करू : भारताची अमेरिकेला अट
...तरच रशियन तेल खरेदी कमी करू : भारताची अमेरिकेला अट
Published on

नवी दिल्ली : रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्याने भारतावर अमेरिकेने २५ टक्के अतिरिक्त शुल्क लावले आहे. रशियाकडून तेल खरेदी कमी करायची असल्यास आम्हाला इराण, व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीची परवानगी द्यावी, अशी अट भारताने अमेरिकेसमोर ठेवल्याचे कळते.

युक्रेन युद्धामुळे लागू करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांनंतर रशियाने आपले तेल कमी किमतीत विकायला सुरुवात केली. भारत हा आपल्या गरजेपैकी ८५ टक्के कच्चे तेल आयात करत आहे. त्यामुळे स्वस्त दरातील रशियन तेल पुरवठ्यामुळे आयात खर्च कमी करण्यास मदत झाली. भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करत आहे. त्यामुळे अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५ टक्के ‘टॅरिफ’ लावले आहे.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी या आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना तेल आयातीबाबत आपली भूमिका ट्रम्प प्रशासनासमोर पुन्हा स्पष्ट केली. भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीत मोठी कपात केली, तर इराण आणि व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची आयात करण्यासाठी अमेरिकेची मंजुरी आवश्यक असेल. कारण या दोन्ही देशांवर सध्या निर्बंध आहेत.

भारतीय प्रतिनिधीमंडळाने आपली भूमिका ठामपणे मांडली. भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशिया, इराण आणि व्हेनेझुएला या तिन्ही देशांकडून तेल खरेदीवर एकाच वेळी निर्बंध आल्यास जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. ही शक्यता चर्चेत सहभागी असलेल्या प्रतिनिधींनीही मान्य केली आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी भारताचा अमेरिकन तेल व गॅस खरेदीत वाढ करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आपल्या ऊर्जा सुरक्षिततेच्या उद्दिष्टांमध्ये अमेरिकेचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर असणार आहे, असे गोयल यांनी सूचित केले.

logo
marathi.freepressjournal.in