भारत-अमेरिका व्यापार करार ९ जुलैपूर्वी होण्याची शक्यता; भारतीय पथक अमेरिकेतून परतले, व्यापार चर्चा सुरू राहणार
नवी दिल्ली : मुख्य वाटाघाटीकार राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ अंतरिम व्यापार करारावरील चर्चेचा आणखी एक टप्पा पूर्ण करून वॉशिंग्टनहून परतले आहे. परंतु कृषी आणि वाहन क्षेत्रातील काही मुद्दे अद्याप सोडवायचे असल्याने चर्चा सुरूच राहतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे आणि ९ जुलैपूर्वी त्याचा निष्कर्ष जाहीर होण्याची अपेक्षा आहे. भारतीय पथक वॉशिंग्टनहून परतले आहे. वाटाघाटी सुरूच राहतील. कृषी आणि वाहन क्षेत्रातील काही मुद्दे सोडवायचे आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. २६ जून ते २ जुलैदरम्यान अमेरिकेसोबतच्या अंतरिम व्यापार करारावरील वाटाघाटीसाठी भारतीय पथक वॉशिंग्टनमध्ये होते.
ट्रम्पच्या परस्पर वाढीव आयात शुल्कावरील स्थगिती ९ जुलै रोजी संपत असल्याने चर्चा महत्त्वाची आहे. त्यापूर्वी दोन्ही बाजू चर्चा अंतिम करण्याचा विचार करत आहेत. अमेरिकन शेती आणि दुग्धजन्य पदार्थांना कर सवलती देण्याबाबत भारताने कडक भूमिका घेतली आहे कारण हे क्षेत्र राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत.
२ एप्रिल रोजी अमेरिकेने भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २६ टक्के परस्पर कर लादला परंतु तो ९० दिवसांसाठी स्थगित केला. तथापि, अमेरिकेने लादलेला १० टक्के ‘बेसलाइन’ कर कायम आहे.