मुंबई: भारतात दररोज लाखो लोक ट्रेननं प्रवास करतात. अनेकांना तर तिकीट असूनही प्रवास करता येत नाही. कारण अनेक कारणांमुळे त्यांना एकतर तिकीट रद्द करावे लागते किंवा रेल्वे स्वतः तिकीट रद्द करते. परंतु तिकीट कॅन्सल केल्यानंतर आपले पैसे यायला खूप वेळ लागतो. परंतु आता रेल्वे कॅन्सल केलेल्या तिकीटांचे पैसे रिफंड करण्याची प्रक्रिया वेगवान करणार आहे.
९८% प्रकरणांमध्ये त्याच दिवशी पैसे-
होय, आता ऑनलाइन रेल्वे तिकीट रद्द केल्यावर रिफंड मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. रेल्वेच्या आकडेवारीनुसार, आता तुम्ही ई-तिकीट ऑनलाइन रद्द केल्यास किंवा तिकीट डिपॉझिट रिसीप्ट (टीडीआर) ऑनलाइन फाइल केल्यास ९८% प्रकरणांमध्ये त्याच दिवशी पैसे परत केले जातील.
५०% तिकिटांचे पैसे सहा तासांच्या आत परत-
एवढेच नाही तर गेल्या काही महिन्यांत रेल्वेनं केलेल्या काही बदलांमुळे तिकिटांचे पैसेही लवकर मिळू लागले आहेत! जर आपण आकडेवारी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की आता रद्द केलेल्या ई-तिकिटांपैकी जवळपास ५०% तिकिटांचे पैसे सहा तासांच्या आत परत केले जात आहेत. याचा अर्थ रेल्वेचे तिकीट ऑनलाइन रद्द केल्यानंतर पैसे परत मिळण्यात फारशी अडचण येणार नाही, ही प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. विविध कारणांमुळं दररोज अंदाजे रेल्वे तिकीटं 5,000 रद्द होतात.
ऑटोमॅटिक रिफंडचा लाभ
यापूर्वी रिफंडची प्रक्रिया अत्यंत संथ आणि किचकट असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. पण, आता ही प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यावर रेल्वे भर देत आहे. तिकीट कॅन्सल केल्यानंतर रिफंड वेळेत मिळावा यासाठी दोन पद्धती अवलंबण्यात आल्या आहेत. वेटिंग लिस्टचं तिकीट आणि रद्द झालेल्या ट्रेनच्या तिकीटांवर ऑटोमॅटिक रिफंडचा लाभ घेता येईल.
दरम्यान, थेट तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना थेट रिफंड मिळणार आहे. त्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना स्वत: चौकशी करून रिफंडची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्वरीत परतावा देण्याचे रेल्वेचे लक्ष्य असेल.टेस्ट दरम्यान, या नवीन पद्धतीने चांगल्या प्रकारे काम होत आहे. आता रद्द झालेल्या तिकिटांपैकी निम्म्याहून अधिक तिकिटांचे पैसे सहा तासांत परत मिळत आहेत.