
नवी दिल्ली : भारतीय रिअल इस्टेटमध्ये २०२४ मध्ये संस्थात्मक गुंतवणूक ५१ टक्क्यांनी वाढून विक्रमी ८.८७ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे कारण गुंतवणूकदार घरांच्या, कार्यालय आणि गोदाम मालमत्ता मागणीचा लाभ घेऊ पाहतात, असे ‘जेएलएल’ने अहवालात म्हटले आहे.
बुधवारी जारी केलेल्या अहवालात रिअल इस्टेट सल्लागार जेएलएल इंडियाने मागील कॅलेंडर वर्षातील ५.८७८ अब्ज डॉलरच्या तुलनेत २०२४ मध्ये भारतीय रिअल इस्टेटमधील संस्थात्मक गुंतवणूक ८.८७८ अब्ज डॉलर एवढी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतीय रिअल इस्टेटमधील एकूण संस्थात्मक गुंतवणुकीपैकी ६३ टक्के गुंतवणूक विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केली आहे. विविध मालमत्ता वर्गांमध्ये, निवासी विभागामध्ये ४५ टक्के, त्यानंतर कार्यालयीन इमारती २८ टक्के आणि गोदाम मालमत्ता २३ टक्के आहेत. २०२४ हे वर्ष भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी मैलाचा दगड आहे, ज्यामध्ये ७८ व्यवहारांमध्ये संस्थात्मक गुंतवणूक ८.९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. हा आकडा २००७ च्या ८.४ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीला मागे टाकला गेला आहे, असे अहवालात म्हटले आहे.
व्यवहारांमध्येही मोठी वाढ झाली असून २०२४ मध्ये ४७ टक्क्यांनी सौद्यांत वाढ झाली.
लता पिल्लई, वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक आणि भांडवली बाजार प्रमुख, जेएलएल इंडिया म्हणाल्या, राजकीय स्थैर्य आणि विविध गुंतवणुकीच्या संधींनी जागतिक आर्थिक संदर्भात भारताला अनुकूल स्थान दिल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात मजबूत वाढ झाली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात संस्थात्मक गुंतवणुकीत वाढ झाली असून २०२३ पासून देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागाने हा लक्षणीय बदल झाला आहे आणि २०१९-२०२२ मधील सरासरी १९ टक्क्यांच्या तुलनेत २०२४ मध्ये त्यांचा हिस्सा ३७ टक्के राहील, असे दिसते.
पिल्लई म्हणाल्या की, भारतातील REITs च्या व्यवहारांमध्ये अलीकडेच लक्षणीय वाढ झाली आहे. २०२४ मध्ये त्यांची गुंतवणूक जवळपास ८०० दशलक्ष अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचली आहे, जी २०२३ च्या पातळीपेक्षा तिप्पटीने वाढली आहे. पुढे भांडवल वाढीमध्ये ‘क्यूआयपी’ची महत्त्वपूर्ण भूमिका असेल अशी अपेक्षा आहे कारण बाजारात नव्याने सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असे त्या म्हणाल्या.