नवी दिल्ली : भारतातील क्रेडिट कार्ड बाजार आर्थिक वर्ष २०२८-२९ पर्यंत कार्ड्सची संख्या दुप्पट करून २० कोटी कार्डांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये क्रेडिट कार्ड उद्योग १०० टक्क्यांनी वाढला आहे, असे पीडब्ल्यूसीच्या अहवालात म्हटले आहे.
अहवालात म्हटले आहे की, क्रेडिट कार्ड जारी करण्याव्यतिरिक्त, त्यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारातही मोठी वाढ झाली आहे. व्यवहारांचे प्रमाण किंवा संख्या २२ टक्क्यांनी वाढली आहे, तर व्यवहारांचे मूल्य २८ टक्क्यांनी वाढले आहे. अहवालात या वाढीचे श्रेय नवीन उत्पादने, नाविन्यपूर्ण ऑफरिंग आणि ग्राहक विभागाच्या विस्ताराला देण्यात आले आहे.
तथापि, अहवालात डेबिट कार्डच्या वापरात घट झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. डेबिट कार्ड व्यवहारांचे प्रमाण आणि मूल्य दोन्ही घटले आहे. हे ग्राहकांच्या पसंतींमध्ये बदल दर्शवते. आथिर्क वर्ष २०२३-२४ मध्ये डेबिट कार्ड्सच्या व्यवहारांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी घट झाली आणि डेबिट कार्डवरील खर्च वार्षिक आधारावर १८ टक्क्यांनी कमी झाला.
देशातील डेबिट कार्ड्स जारी करण्याच्या बाबतीत मंद गतीने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये डेबिट कार्डचे प्रमाण आणि मूल्य लक्षणीयरीत्या घटले आहे, असे अहवालात म्हटले आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) च्या वाढत्या वापरामुळे डेबिट कार्डच्या प्रमाणात घट झाली आहे. यूपीआयच्या लोकप्रियता, ते वापरण्यास सोपे आहे आणि शून्य व्यापारी सवलत दर (एमडीआर) मुळे लहान ते मध्यम व्यापाऱ्यांसाठी पसंतीची पेमेंट पद्धत बनली आहे.