भारताच्या जीडीपी अंदाजात कपात; २०२४-२५ साठी ७ टक्क्यांवरुन ६.५ टक्क्यांवर एडीबीचा ताजा अहवालाचा निष्कर्ष
नवी दिल्ली : भारताच्या आर्थिक विकासाचा (जीडीपी) दर २०२४-२५ मध्ये ७ टक्क्यांवरून कमी करून ६.५ टक्के राहण्याचा नवा अंदाज आशियाई विकास बँकेने (एडीबी) बुधवारी जाहीर केला. खाजगी गुंतवणूक आणि गृहनिर्माण मागणीतील अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाल्यामुळे हा अंदाज बदलला आहे. तसेच २०२५-२६ आर्थिक वर्षासाठीही भारताचा जीडीपी ७.२ टक्क्यांवरुन कमी करुन ७ टक्क्यांवर राहण्याचाही नवा अंदाज जाहीर केला आहे.
“अमेरिकेतील व्यापार, वित्तीय आणि स्थलांतर धोरणांतील बदल विकासावर परिणाम करू शकतात आणि आशिया तसेच पॅसिफिकमधील महागाई वाढवू शकतात,” असे आशियाई विकास दृष्टिकोन (एडीओ) च्या ताज्या आवृत्तीत नमूद केले आहे.
अहवालानुसार, आशिया आणि पॅसिफिकमधील अर्थव्यवस्था २०२४ मध्ये ४.९ टक्क्यांनी वाढेल, जो एडीबीच्या सप्टेंबरच्या अंदाजातील ५ टक्क्यांपेक्षा किंचित कमी आहे.
एडीबीच्या म्हणण्यानुसार, “भारताचा विकासाचा अंदाज खाजगी गुंतवणूक आणि गृहनिर्माण मागणीतील अपेक्षेपेक्षा कमी वाढीमुळे या वर्षासाठी ७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांवर, तर पुढील वर्षासाठी ७.२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर राहण्याचे नवे भाकीत करण्यात आले आहे.”
गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने देखील चालू आर्थिक वर्षासाठी विकासाचा अंदाज ७.२ टक्क्यांवरून कमी करून ६.६ टक्क्यांवर आणला आणि अन्नधान्याच्या किंमतीतील स्थिरतेमुळे आणि आर्थिक उलाढालीतील मंदीमुळे महागाईचा अंदाज ४.८ टक्क्यांवर वाढवला.
२०२४-२५ च्या चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर ५.४ टक्क्यांवर घसरला, जो मागील सात तिमाहीतील नीचांकी आहे, आणि रिझर्व्ह बँकेच्या ७ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कमी आहे.
एडीबीने म्हटले आहे की, भारताचा विकास दर मजबूत राहील. अर्थव्यवस्थेला खरीप हंगामातील शेती उत्पादनामुळे आधार मिळेल, ज्यामुळे अन्नधान्याच्या किंमती कमी होतील; सेवाक्षेत्राची सातत्यपूर्ण क्षमता; तसेच २०२४ आणि २०२५ मधील अपेक्षेपेक्षा कमी ब्रेंट क्रूडच्या किंमती राहतील. याशिवाय, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांसाठी पीएमआय, शहरी श्रमशक्तीचा सहभाग आणि रिझर्व्ह बँकेच्या औद्योगिक दृष्टिकोन यांसारखे मजबूत संकेतक आगामी तिमाहीत आर्थिक गती सुधारेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दक्षिण-आशियातील विकासाचा अंदाज ४.५ टक्क्यांवरून ४.७ टक्क्यांवर वाढवला
अहवालात म्हटले आहे की, दक्षिण-आशियातील विकासाचा अंदाज ४.५ टक्क्यांवरून ४.७ टक्क्यांवर वाढवण्यात आला आहे. हे प्रामुख्याने मजबूत उत्पादन निर्यात आणि सार्वजनिक भांडवली खर्चामुळे झाले आहे. पुढील वर्षासाठीचा अंदाज ४.७ टक्के असा कायम ठेवण्यात आला आहे. मनीला येथील मुख्यालय असलेल्या एडीबी बँकेने चीनच्या जीडीपी वृद्धी दर अंदाज २०२४ साठी ४.८ टक्के आणि २०२५ साठी ४.५ टक्के असा कायम ठेवला आहे. आशिया आणि पॅसिफिकच्या आर्थिक विकासाचा दर यावर्षी आणि पुढील वर्षी स्थिर राहील. मात्र, अमेरिकेतील नव्या प्रशासनाचे संभाव्य धोरण बदल दीर्घकालीन दृष्टीकोनावर परिणाम करू शकतात, म्हटले आहे.