
नवी दिल्ली : उत्तम दर्जाच्या स्मार्टफोनच्या वाढत्या खरेदीमुळे आणि स्थानिक उत्पादनावर भर दिल्याने भारताच्या स्मार्टफोन बाजारपेठेचे मूल्य २०२५ पर्यंत ५० अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे, असे शुक्रवारी जाहीर झालेल्या अहवालात नमूद केले आहे.
काऊंटरपॉइंटच्या ‘इंडिया स्मार्टफोन आऊटलूक’च्या नवीनतम संशोधनानुसार भारताच्या स्मार्टफोन बाजाराची किरकोळ सरासरी विक्री किंमत (ASP) यावर्षी प्रथमच ३०० डॉलरचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे. ॲपल आणि सॅमसंग प्रीमियम आणि अल्ट्रा-प्रीमियम विभागांमध्ये स्पर्धात्मक पर्याय देत या बदलाचे नेतृत्व करत आहेत.
आयफोनचे स्थानिक उत्पादन आणि त्याच्या नव्या उत्पादनांबरोबरच अलीकडील किमती कपातीमुळे ॲपलला त्याच्या प्रो-मॉडेल्ससाठी जोरदार मागणी अपेक्षित आहे.
दरम्यान, सॅमसंगची मूल्य-केंद्रित रणनीती विशेषत: त्याच्या फ्लॅगशिप एस सीरिजसह, आकर्षण ठरत आहे. वनप्लस त्याच्या फ्लॅगशिप वनप्लस 13 लाँच करून, अल्ट्रा-प्रिमियम सेगमेंटमध्ये (रु. ४५ हजारांपेक्षा जास्त) आपला हिस्सा वाढवण्याचे लक्ष्य ठेवत आहे, असे अहवालात नमूद केले आहे.
ग्राहकांनी ऑफलाइन स्टोअर्सची निवड केल्यामुळे ‘प्रीमियम’ फोनची मागणी वाढत आहे. कारण ग्राहक खरेदी करण्यापूर्वी प्रीमियम स्मार्टफोन्सचा अनुभव घेऊ शकतात. अहवालात असे म्हटले आहे की, एआय-शक्तीवर चालणाऱ्या वैशिष्ट्यांमध्ये वाढत्या स्वारस्यामुळे ग्राहकांना या नवकल्पनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रात्यक्षिके घेण्यास प्रवृत्त केले आहे. भारतीय स्मार्टफोन बाजार वेगाने विकसित होत आहे, मूळ उपकरण उत्पादक (OEMs) ब्रँड इक्विटी मजबूत करण्यासाठी, तांत्रिक क्षमता प्रदर्शित करण्यासाठी आणि नफा वाढण्यासाठी प्रीमियम लॉन्चवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहेत, असे अहवालात नमूद केले आहे.
परवडणाऱ्या प्रीमियम श्रेणीमध्ये (रु. ३० हजार ते ४५ हजार), विवो, ओप्पो आणि वनप्लस सारखे ब्रँड प्रगत कॅमेरा सिस्टीम आणि सीएमएफ डिझाईन्स ऑफर करून ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
वनप्लसने स्थानिक बाजाराच्या विस्तारामध्ये टप्प्याटप्प्याने केलेल्या ६ हजार कोटी रुपयांच्या नियोजित गुंतवणुकीमुळे त्याच्या पुनर्प्राप्ती आणि वाढीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अहवालानुसार, देशातील प्रीमियम सेगमेंट (रु.३० हजार आणि त्याहून अधिक) २०२५ पर्यंत २० टक्क्यांहून अधिक बाजारपेठेतील वाटा असेल, असा अंदाज आहे.