

नवी दिल्ली : आयटी उद्योग संघटना नासकॉमने भारतात जबाबदारीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी ‘द डेव्हलपर्स प्लेबुक’ सादर केले आहे. हे प्लेबुक विकसित होत असलेल्या एआय जोखीम व्यवस्थापनाच्या गुंतागुंतीच्या क्षेत्रात विकासकांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकते.
हे प्लेबुक भारतात एआयच्या व्यावसायिक विकास, अंमलबजावणी आणि वापराशी संबंधित संभाव्य जोखमींची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांना कमी करण्यासाठी एक ‘फ्रेमवर्क’ प्रदान करते.
विकसकांना एआय जोखीम व्यवस्थापनाच्या गुंतागुंतीच्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या या क्षेत्रात काम करताना भेडसावणाऱ्या आव्हानांची जाणीव ठेवून नासकॉमच्या रिस्पॉन्सिबल एआय हबने ‘द डेव्हलपर्स प्लेबुक फॉर रिस्पॉन्सिबल एआय इन इंडिया’ सादर केले आहे, असे नासकॉमने एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले.
हे प्लेबुक देशभरातील ‘रिस्पॉन्सिबल इन्टेलिजियन्स कॉन्फ्लुएन्सच्या’ (RICON) पहिल्या आवृत्तीमध्ये सादर करण्यात आले. हे प्लेबुक विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विषय तज्ज्ञ, औद्योगिक, सरकारी, शैक्षणिक आणि नागरी समाजातील भागधारकांच्या कठोर आढावा आणि वैधतेच्या प्रक्रियेतून गेले आहे. त्यामुळे ते जबाबदार एआय पद्धतींच्या संतुलित आणि समर्थित दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे, जे देशाच्या व्यापक हितासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी दृढपणे संरेखित आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आयटी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि इंडिया एआय मिशनचे सीईओ अभिषेक सिंग यांनी नमूद केले की, हे प्लेबुक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी मार्गदर्शन प्रदान करते. यामुळे संभाव्य जोखमी ओळखणे, सर्वोत्तम पद्धतींशी संरेखित करणे आणि जबाबदार एआय पद्धती स्वीकारणे सुलभ होते, तसेच एआयच्या विकास आणि अंमलबजावणीसाठी विकसित होत असलेल्या दृष्टिकोनांना अनुकूलतेची संधी मिळते.
नासकॉमच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य रणनीती अधिकारी संगीता गुप्ता यांनी नमूद केले की, हे प्लेबुक विकसकांना जबाबदार एआयच्या तत्त्वांशी त्यांच्या पद्धती संरेखित करण्यासाठी व्यावहारिक चौकट काय आहे, हे सांगते.