नवी दिल्ली : इराणमधील नागरी अशांततेमुळे त्या देशाला होणाऱ्या भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी देशांतर्गत किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे, कारण निर्यातदारांना पेमेंटमध्ये विलंब आणि वाढत्या अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे, असे एका उद्योग संघटनेने मंगळवारी सांगितले.
इंडियन राइस एक्सपोर्टर्स फेडरेशन (आयआरईएफ)ने निर्यातदारांना इराणी करारांवरील जोखमीचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आणि सुरक्षित पेमेंट यंत्रणा स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच इराणी बाजारासाठी असलेल्या साठ्याचा अतिवापर करण्याविरोधात इशारा दिला.
व्यापार आकडेवारीनुसार भारताने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान इराणला ४६८.१० दशलक्ष डॉलर किमतीच्या बासमती तांदळाची निर्यात केली, जी एकूण ५.९९ लाख टन होती.
इराण हे भारतासाठी बासमती तांदळाच्या निर्यातीचे प्रमुख ठिकाण आहे, परंतु सध्याच्या अस्थिरतेमुळे या चालू आर्थिक वर्षात ऑर्डरचा प्रवाह, पेमेंट चक्र आणि शिपमेंटच्या वेळापत्रकांवर वाढता ताण दिसून येत आहे. याचा परिणाम आता देशांतर्गत बाजारपेठांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या एका आठवड्यातच, बासमतीच्या प्रमुख प्रकारांच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे, जी खरेदीदारांची अनिच्छा, करारांना होणारा विलंब आणि निर्यातदारांमध्ये वाढलेली जोखीम भावना दर्शवते.
बासमती तांदळाच्या ११२१ या प्रकाराची देशांतर्गत किंमत गेल्या आठवड्यातील ८५ रुपये प्रति किलोवरून ८० रुपये प्रति किलोवर आली आहे, तर १५०९ आणि १७१८ या प्रकारांच्या किमती ७० रुपये प्रति किलोवरून ६५ रुपये प्रति किलोवर घसरल्या आहेत.