एफपीआयने ५ एप्रिलपर्यंत ३२५ कोटी काढले

कॅपिटलमाइंडचे स्मॉलकेस मॅनेजर आणि वरिष्ठ संशोधन विश्लेषक कृष्णा अप्पाला यांनी विश्वास व्यक्त केला की, भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर किंवा अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या सुरुवातीच्या लक्षणानंतर एफपीआय पुन्हा आपला ओघ सुरू करू शकते.
एफपीआयने ५ एप्रिलपर्यंत ३२५ कोटी काढले

नवी दिल्ली : एफपीआयने पुन्हा सावध भूमिका घेतली असून त्यांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुलनेने उच्च मूल्यमापन आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातून ३२५ कोटी रुपये काढले आहेत. मार्चमध्ये रु. ३५ हजार कोटी रुपये आणि फेब्रुवारीमध्ये ५३९ कोटी रु. गुंतवणुकीनंतर एफपीआयने पुन्हा पैसे काढून घेण्यास सुरुवात केल्याचे डिपॉझिटरीजच्या आकडेवारीवरून दिसून आले.

अमेरिकेतील १० वर्षांचे उत्पन्न ४.४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात भारतातील एफपीआय (परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार) गुंतवणुकीवर परिणाम होईल, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक स्ट्रॅटेजिस्ट व्हीके विजयकुमार म्हणाले. तथापि, भारतीय शेअर बाजार तेजीत असल्याने आणि सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करत असल्याने उच्च अमेरिकी रोखे उत्पन्न असूनही एफपीआयची विक्री मर्यादित राहील, असेही ते म्हणाले.

कॅपिटलमाइंडचे स्मॉलकेस मॅनेजर आणि वरिष्ठ संशोधन विश्लेषक कृष्णा अप्पाला यांनी विश्वास व्यक्त केला की, भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर किंवा अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या सुरुवातीच्या लक्षणानंतर एफपीआय पुन्हा आपला ओघ सुरू करू शकते.

डिपॉझिटरीजमधील आकडेवारीनुसार, एफपीआयने या महिन्यात (५ एप्रिलपर्यंत) भारतीय समभागांमधून ३२५ कोटी रुपये काढले. तुलनेने उच्च मूल्यमापन आणि आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे एफपीआय सावध झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सध्या इक्विटी मार्केटमधील आक्रमक गुंतवणूकीपासून स्वत:ला रोखले आहे, असे अप्पाला म्हणाले.

दुसरीकडे, एफपीआयने ५ एप्रिलपर्यंच्या कालावधीत कर्ज बाजारात १,२१५ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. भारतीय सरकारी सिक्युरिटीज (G-Sec) १० वर्षांचे उत्पन्न ७.१ टक्के आणि अमेरिकेत १० वर्षात ४.३ टक्के उत्पन्न पाहता सरकारी सिक्युरिटीज त्यांना आकर्षित करतात. शिवाय, जेपी मॉर्गन इंडेक्समध्ये भारत सरकारच्या रोख्यांच्या आगामी समावेशाच्या पार्श्वभूमीवर एफपीआय गेल्या काही महिन्यांपासून कर्ज बाजारांमध्ये पैसे गुंतवत आहे. त्यांनी फेब्रुवारीमध्ये २२,४१९ कोटी रुपये, जानेवारीमध्ये १९,८३६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. एकूणच, या वर्षातील एकूण ओघ आतापर्यंत १०,५०० कोटी रुपयांहून अधिक इक्विटीमध्ये आणि ५७ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज बाजारात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in