
मुंबई : महाराष्ट्र ग्रामीण बँकेने मकर संक्रांतीच्या दिवशी एकूण व्यवसायाचा रु. ३०,००० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. आपल्या व्यवसायासह बँकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांच्या आधारे बँक देशातील ग्रामीण बँकांमध्ये अग्रेसर ठरली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक ही बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत प्रादेशिक ग्रामीण बँक असून बँकेत केंद्र सरकार (५० टक्के), राज्य सरकार (१५ टक्के) आणि बँक ऑफ महाराष्ट्र (३५ टक्के) यांचे भागभांडवल आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँक सद्यस्थितीत महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून तिच्या ४२६ शाखांद्वारे ग्राहकांना विविध बँकिंग सेवा पुरवल्या जात आहेत. बँकेच्या एकूण व्यवसायात तब्बल १७,६०० कोटी रुपये ठेवी आणि १२,४०० कोटी रुपये कर्जांचा समावेश आहे.
बँकेने एकूण २४१९ कोटीच्या पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत तब्बल २३९० कोटींचे वाटप करून ९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. बँकेमार्फत ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, AEPS, DBT तसेच UPI सारख्या अद्ययावत सुविधा देखील पुरविण्यात येत आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेने नुकतेच UPI पेमेंट्सच्या पुष्टीकरणासाठी क्यूआर कोड साउंड बॉक्सेस उपलब्ध करून दिले आहेत. याव्यतिरिक्त, बँकेने ‘एमजीबी विश्वास’ अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ केवायसी द्वारे घरबसल्या बचत खाते उघडण्याची सुविधा देखील सुरू केली आहे, सदर ॲप Play Store आणि App Store वर देखील उपलब्ध आहे.
बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी सर्व ग्राहक, हितचिंतक आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांचे या अभूतपूर्व यशासाठी आभार मानले आहेत. त्यांनी सर्वांना बँकेच्या अभिनव सेवांचा आणि सुविधांचा पूर्णपणे उपयोग करण्याचे आवाहन देखील याप्रसंगी केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सर्व ग्राहकांचे, हितचिंतकांचे आणि कर्मचाऱ्यांचे या अद्वितीय यशासाठी हार्दिक अभिनंदन त्यांनी केले.