
मुंबई : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. त्यामध्ये रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग आदींसह बंदर आणि विमानतळ विकासाच्या कामांचा समावेश आहे. या संपूर्ण विकासाच्या ‘इकोसिस्टीम’मुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबईत हॉटेल फोर सीजन येथे ‘इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडर समिट- २०२५’चे आयोजन करण्यात आले. या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. त्यात मुख्यमंत्र्यांनी विविध प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम गतीने सुरू आहे. या ट्रेनने २०२८ पर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक निर्माण करण्यात येणार आहे. मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. सागरीकिनारा रस्ता, अटल सेतू, विविध मेट्रो मार्गांची कामे ही त्यातली ठळक उदाहरणे आहेत. या सर्व विकासकामांमुळे मुंबईत गुंतवणूक ५० अब्ज डॉलरपर्यंत जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरणारे आहेत. यासोबतच पुणे येथील नवीन विमानतळ, शिर्डी, नागपूर विमानतळाच विकास, नदीजोड प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. सागरीकिनारा रस्ता विरारपर्यंत वाढविण्यात येत आहे. वाढवण बंदर हे सध्या अस्तित्वात असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्टपेक्षा तीन पट मोठे आहे. या बंदराला प्रवेश नियंत्रित असलेल्या महामार्गाने नाशिकपर्यंत जोडण्यात येऊन पुढे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल. वाढवण बंदराजवळ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच या परिसरात चौथ्या मुंबईचेही निर्माण करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरामुळे वाहून जाणारे पाणी तसेच पश्चिम घाटातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उजनी धरण व मराठवाड्यात वळविण्यात येणार आहे. यावर राज्य शासन काम करीत आहे. त्यामुळे भविष्यात मराठवाडा निश्चितच दुष्काळमुक्त होणार आहे. समृद्धी महामार्गनंतर राज्यात नागपूर ते गोवा ‘शक्तिपीठ महामार्ग’ निर्माण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे नेहमी भविष्यासाठी ‘रेडी’ असणारे राज्य आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गुंतवणूकदारांना सोयीसुविधा मिळण्यासाठी व गतीने गुंतवणूक येण्यासाठी ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’मध्ये राज्य मोठी झेप घेत आहे. २०२९ मध्ये महाराष्ट्र ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’मध्ये पहिला असेल. गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी मैत्री पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून ‘सिंगल विंडो सिस्टीम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना सिंगल विंडो सिस्टीममुळे उद्योग स्थापन करण्यास सुलभता येत आहे.
दळणवळणाच्या सोयीसुविधांचा होणाऱ्या विकासामुळे राज्यात मालवाहतूक गतीने करण्यात येत आहे. नागपूरपर्यंत आठ तासांमध्ये जवाहरलाल नेहरू बंदरापासून जाता येते. वाढवण बंदरामुळे यामध्ये आणखी गतिमानता येणार आहे. नागपूर येथे कार्गो हब विकसित करण्यात आले आहे. यासोबतच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरही कार्गो हब विकसित करण्यात येत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विकासाचा आलेख मांडला.
तिसरी मुंबई निर्माण होणार
‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ तसेच ‘अटल सेतू’ यामुळे तिसरी मुंबई निर्माण होणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, या भागात नवीन एज्युसिटी निर्माण करण्यात येत आहे. जगभरातील विविध नामांकित विद्यापीठे या परिसरात शैक्षणिक दालन उघडणार आहेत. त्यासोबतच हेल्थ सिटी, इनोवेशन सिटीचे निर्माणही करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा निर्मिती करण्यात येत आहे कृषी क्षेत्राचे १६ हजार मेगावाॅटची वीज पूर्णपणे सौरऊर्जेवर निर्माण करण्यात येणार आहे. सध्या या क्षेत्रात २१ टक्के राज्याची क्षमता असून २०३० पर्यंत ती ५२ टक्क्यांपर्यंत नेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे ३००० रोहित्र सौरऊर्जेवर आणण्यात आल्या आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मोठी मागणी राज्यात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये महाराष्ट्र हे देशाची राजधानी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.