फोनवर अनोळखी व्यक्तीचे नावही दिसणार, दूरसंचार कंपन्यांकडून चाचण्या सुरू

ऑनलाईन फ्रॉडमुळे ग्राहकांचे लाखो-करोडो रुपये हातोहात पळवले जात आहेत. याला आळा घालण्यासाठी फोनवर लवकरच नवीन सुविधा मिळणार आहे.
फोनवर अनोळखी व्यक्तीचे नावही दिसणार, दूरसंचार कंपन्यांकडून चाचण्या सुरू
प्रातिनिधिक चित्र
Published on

नवी दिल्ली : मोबाईल फोनने आपल्या जीवनात क्रांती केली आहे. त्यामुळे आपल्या खासगी जीवनात त्याचा हस्तक्षेप वाढला आहे. तसेच मोबाईल फोनमुळे हॅकर्सचे फावले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. ऑनलाईन फ्रॉडमुळे ग्राहकांचे लाखो-करोडो रुपये हातोहात पळवले जात आहेत. याला आळा घालण्यासाठी फोनवर लवकरच नवीन सुविधा मिळणार आहे. आपल्या फोनवर अनोळखी व्यक्तीने फोन केल्यास त्याचे नाव आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला नेमका कोणी फोन केला हे समजू शकेल. या नवीन यंत्रणेच्या चाचण्या दूरसंचार कंपन्यांकडून सुरू झाल्या आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशात ही यंत्रणा लागू केली जाईल.

तुम्हाला ओटीपी आलाय...तुम्हाला बक्षीस लागले...तुम्हाला कार लागली...तुमचे सामान पकडले, आदींचे वेगवेगळे भूलथापा देणारे फोन व मेसेज येत असतात. त्यांना बळी पडून सर्वसामान्यांचे मोठे नुकसान होते. या अनोळखी क्रमांकावर कारवाई करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सरकारकडे होत होती. त्यामुळे सरकारने या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

नवीन यंत्रणेचे नामांकन ‘कॉलिंग नेम प्रेझेंटेशन’ (सीएनएपी) असे केले आहे. बनावट व फसवणुकीचे कॉल रोखण्यासाठी ही यंत्रणा तयार केली. सध्या बनावट कॉलचे प्रमाण वाढले आहे. सरकार व ‘ट्राय’च्या दबावामुळे दूरसंचार कंपन्यांनी ही सेवा सुरू केली आहे.

दूरसंचार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या नवीन यंत्रणेचे निष्कर्ष जाणून घेण्यासाठी आम्ही कमी प्रमाणात याच्या चाचण्या करत आहोत. त्यामुळे आता येणाऱ्या कॉलमध्ये समोरच्या व्यक्तीचे नावही दिसणार आहे. या चाचण्यांचे निष्कर्ष दूरसंचार विभागाला देणार आहोत. त्यामुळे या सेवेबाबत व्यावहारिक निर्णय घेता येऊ शकेल.

ट्रू कॉलरसारखी सेवा असेल

ट्रू कॉलर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ऋषित झुनझुनवाला यांनी सांगितले की, ‘सीएनएपी’ सेवा सध्याच्या कॉलर आयडी ॲॅप्लिकेशनसारखी असेल. यामुळे आमच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही.

बनावट आंतरराष्ट्रीय कॉल्स ब्लॉक

भारतीय क्रमांक दाखवणारे बनावट आंतरराष्ट्रीय कॉल्स ब्लॉक करण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना सरकारने नुकतेच दिले होते. कारण दूरसंचार विभागाकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. कारण या कॉल्समुळे सायबर गुन्हेगारी व वित्तीय गुन्हेगारी वाढत आहे.

logo
marathi.freepressjournal.in