नवी दिल्ली : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये मोठ्या प्रमाणात साखर आढळल्याचा दावा पब्लिक आय या वेबसाइटने तपासणीनंतर केला आहे. या आधी देखील नेस्ले मॅगीच्या उत्पादनामुळे चर्चेत होती. नेस्लेची उत्पादने भारताच नव्हे तर जगभरातसुद्धा सर्वाधिक विकले आहेत. त्यांच्या बेबी फूडला भारतात बरीच मागणी आहे.
स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध कंपनी नेस्लेकडून भारतात अन्य देशांमध्ये विकले जाणाऱ्या दूध आणि सेरेलॅक यासारख्या उत्पादनांमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे उघड झाले आहे. साखरेचा हा वापर लहान मुलांच्या स्वास्थासाठी अनुकूल नसल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले. अशाप्रकारे केलेल्या साखरेच्या वापराने जुने आजार आणि मुलांमध्ये लठ्ठपणा येण्याची शक्यता त्यांनी सांगितली असून मुलांना साखर खाण्याची सवय लागू शकते, असेही या वेबसाइटने म्हटले आहे. नेस्ले त्यांच्या पॅकेजिंगमध्ये त्यांचा उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या संपूर्ण सामग्रीचा उल्लेख त्यात करते. मात्र साखरेचा किती वापर केला, त्याचा उल्लेख यात नसतो. साखरेचा वापर नेस्लेकडून लपवला जात असल्याचे यात दिसून येते. खरेदीदाराची नेस्लेकडून फसवणूक केली जात आहे हे ही पब्लिक आयने दिलेल्या माहितीतून समजते. बेबी प्रॉडक्ट्समध्ये सरासरी ३ ग्रॅम साखर असते. एका वेळी मुलांना किती प्रमाणात सेरेलॅक द्यावा लागतो, हे कंपनीकडून सांगण्यात येते. आफ्रिकेतील इथिओपिया आणि आशियातील थायलंडसारख्या देशांमध्ये ६ ग्रॅमपर्यंत साखर आढळून आली आहे. विशेष म्हणजे की जर्मनी आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये मात्र त्यात साखर नसते.
नेस्ले इंडियाचे समभाग ३ टक्क्यांहून अधिक घसरले
जागतिक एफएमसीजी कंपनीने कमी विकसित देशांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या शिशु दुग्धजन्य पदार्थांची विक्री केल्याच्या अहवालामुळे नेस्ले इंडियाचे शेअर्स गुरुवारी ३ टक्क्यांहून अधिक घसरले. बीएसईवर शेअर ३.३१ टक्क्यांनी घसरून २,४६२.७५ रुपयांवर बंद झाला. दिवसभरात तो ५.४० टक्क्यांनी घसरून २,४०९.५५ रुपयांवर गेला होता. बीएसई सेन्सेक्स कंपन्यांमध्ये नेस्लेचे सर्वात मोठे नुकसान झाले. तर एनएसईमध्ये कंपनीचे शेअर्स २.९४ टक्क्यांनी घसरून २,४७१ रुपयांवर बंद झाले. कंपनीचे बाजार भांडवल ८,१३७.४९ कोटींनी घसरून रु. २,३७,४४७.८० कोटी झाले.
पौष्टिकतेबाबत उत्पादनाशी तडजोड नाही : नेस्लेचे स्पष्टीकरण
“आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आमची बाळांसाठी पोषक अन्नपदार्थ हे बाळांना आवश्यक असलेली तृणधान्ये, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे, खनिजे, लोह इत्यादी पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केले जातात. आम्ही आमच्या उत्पादनांच्या पौष्टिक गुणवत्तेशी कधीही तडजोड करत नाही आणि कधीही तडजोड करणार नाही. आमच्या उत्पादनातील पोषकतत्त्वे वाढवण्यासाठी आम्ही आमच्या व्यापक जागतिक संशोधन आणि विकास नेटवर्कचा सतत फायदा घेतो, असे नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. अत्यावश्यक असलेल्या पौष्टिक पदार्थांबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही. आम्ही हे देखील सुनिश्चित करतो की भारतात उत्पादित केलेली आमची उत्पादने CODEX मानके (WHO आणि FAO द्वारे स्थापित कमिशन) आणि साखरेसह सर्व पोषक घटकांच्या आवश्यकतांशी संबंधित स्थानिक वैशिष्ट्यांचे (आवश्यकतेनुसार) पूर्ण आणि काटेकोर पालन करतो. साखरेचे प्रमाण कमी करणे हे नेस्ले इंडियाचे प्राधान्य आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये, प्रकारानुसार आम्ही आधीच जोडलेल्या साखरेचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. आम्ही नियमितपणे आमच्या उत्पादनांचा आढावा घेतो.