
मुंबई : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ह्या भारतातील सर्वात मोठ्या नागरी सहकारी बँकेने स्वेच्छेने रिझर्व्ह बँकेकडे ‘न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (एनआयसीबीएल) चे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (एससीबीएल) मध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सदर विलीनीकरण हे दोन्ही भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे. या विलीनीकरणानंतर सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्व मालमत्ता आणि दायित्वांची जबाबदारी घेईल. तसेच ठेवीदारांच्या हिताची आणि सुरक्षिततेची बँकेतर्फे जपणूक केली जाईल.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत सहकारी बँकांना आपल्या बँकेत सामावून घेणे ही सारस्वत बँकेची पूर्वापार परंपरा आहे. यापूर्वी सारस्वत बँकेमध्ये •मराठा मंदिर सहकारी बँक, मांडवी सहकारी बँक,• अण्णासाहेब कराळे जनता सहकारी बँक लि.,• मुरघा राजेंद्र सहकारी बँक लि., • नाशिक पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.,• साऊथ इंडियन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,• कोल्हापूर मराठा सहकारी बँक लि. आदी बँका विलीन झाल्या.
वरील डबघाईतील बँकांमधील सुमारे ८ लाखांहून अधिक ठेवीदारांना सहाय्य करून, सारस्वत बँकेने या अडचणीत सापडलेल्या बँकांना पुन्हा कार्यरत केले. या सात कमकुवत बँकांचे सारस्वत बँकेत विलीनीकरण झाल्यानंतर, या बँकांचा व्यवसाय पाच वर्षांच्या कालावधीत रुपये १९०० कोटींवरून रुपये ९२०० कोटींपर्यंत वाढला. सहकारी क्षेत्राप्रती आपली दृढ वचनबद्धता राखत आणि न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या चिंतातूर ठेवीदारांना दिलासा देऊन, सारस्वत बँक सहकारी बँकांच्या तत्त्वाचे पालन करत न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या ठेवीदारांचे स्वागत करीत आहे.